देवेंद्र फडणवीसांची वाचाळवीर आमदारांना सक्त ताकीद, म्हणाले, विरोधकांच्या हाती आयतं….

पुणे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या मुंबईतील वर्षा या निवासस्थानी बुधवारी रात्री महायुतीच्या आमदारांसाठी स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी मुख्यमंत्र्यांनी उपस्थित आमदार आणि मंत्र्यांशी संवाद साधला आहे.
महायुतीमध्ये वाद होईल, असे कोणतेही वक्तव्य करु नका. एखादे वादग्रस्त वक्तव्य करुन पावसाळी अधिवेशनात विरोधकांच्या हाती आयते कोलीत देऊ नका, अशी सक्त ताकीद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीमधील वाचाळवीर आमदारांना दिली आहे.
गेल्या काही दिवसांमध्ये महायुतीमधील काही आमदार विविध मुद्द्यांवरुन एकमेकांवर दुगाण्या झाडताना दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी भाजप आणि महायुतीच्या आमदारांना, ‘महायुतीत वाद होतील, अशी वक्तव्य टाळा’, अशी स्पष्ट सूचना सर्वांना दिली.
दरम्यान, वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या आमदार आणि मंत्र्यांनाही वरिष्ठांकडून सूचना देण्यात आल्याचे समजते. महायुतीच्या या डिनर डिप्लोमसी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांच्या तयारीला लागण्याचेही आदेश देण्यात आले आहेत.
तसेच सर्व आमदारांनी सभागृहात पूर्ण वेळ उपस्थित राहावे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्व आमदारांनी अधिक सक्रिय राहावे. आपल्या मतदारसंघात जनतेशी संपर्कात राहून कार्य करावे.
सोशल मीडियाचा प्रभाव लक्षात घेता, सर्वांनी सोशल मीडियावर अधिक प्रभावीपणे सक्रिय राहावे, अशा सूचना महायुतीच्या सर्व आमदार आणि मंत्र्यांना देण्यात आल्या. दरम्यान, गुरुवारी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा चौथा दिवस आहे. आतापर्यंत विरोधकांना सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्यात विशेष यश मिळालेले नाही. मात्र, पावसाळी अधिवेशनाच्या आगामी दिवसांमध्ये विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये जोरदार जुंपण्याची शक्यता आहे.