लोकांना संघटित करून उत्तम संस्कार देण्यासाठी वारकऱ्यांचे योगदान – शरद पवार

पुणे : देशाचा अनेक वर्षांचा इतिहास हा बघितल्यानंतर लोकांना संघटित करण्यासाठी आणि त्यांच्यावर उत्तम संस्कार देण्यासाठी अनेक वर्ष काही घटकांनी प्रचंड कामगिरी केली. ती मालिका बघितली तर वारकऱ्यांशिवाय ही मालिका कधी पूर्ण होऊ शकत नाही. असे प्रतिपादन केंद्रीय माजी कृषी मंत्री शरद पवार यांनी केले आहे.
अभिनव मित्र मंडळ शिंदेवाडी संस्था व वारकरी संतपीठ फाऊंडेशन आयोजित वारकरी संत पीठ भूमिपूजन व लोकनेते दादा जाधवराव माध्यमिक विद्यालय रौप्य महोत्सव कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून शरद पवार उपस्थित होते. यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार बापूसाहेब पठारे, जगन्नाथराव शेवाळे, ऍड. अशोक पवार व इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शरद पवार म्हणाले की, आज आपण बघतो, पंढरीची वारी असो किंवा आणखी काही कार्यक्रम असो कशाचाही विचार न करता त्यामध्ये सहभागी झालेले लाखो लोक आपल्याला बघायला मिळतात. उन्हातानाचा विचार करत नाहीत, दगड धोंड्यांचा विचार करत नाहीत. मनामध्ये संतांचा विचार ठेवून त्याचा प्रचार करण्यासाठी आवश्यकता ही गोष्ट ध्यानात ठेवून आज पांडुरंगाचे दर्शन घेण्यासाठी त्या ठिकाणी जात असतात.
या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य हे आहे की, माध्यमिक विद्यालयाचा रौप्य महोत्सव आणि संतांचा विचार हा जनमानसांपर्यंत पोहोचवण्यासाठी एक व्यासपीठ असावं, त्याची उभारणी करण्यासंबंधीचा विचार आजच्या या कार्यक्रमामध्ये आहे. त्यामध्ये ज्यांनी पुढाकार घेतला ते विकास लवांडे आणि त्यांचे सगळे सहकारी या सगळ्यांचे याठिकाणी मी मनापासून स्वागत करतो.
त्याचा पाया हा शास्त्रशुद्ध व्हावा, संतांचा विचार हा प्रस्तुत करण्यासाठी योग्य असा अभ्यासक्रम असावा, गुरुकुल पद्धतीचा स्वीकार व्हावा. असे काही उद्देश विकास लवांडे यांनी पुढे ठेवले.
समाधानाची गोष्ट अशी आहे की, या सगळ्या विचारांना, उद्देशांना आशीर्वाद देण्यासाठी दिनकर शास्त्री भुकेले , राजाभाऊ चोपदार , भारत घोगरे महाराज असोत, बापूसाहेब महाराज मोरे, ज्ञानेश्वर महाराज जळगावकर ही सगळी या क्षेत्रातील कशाचाही यत्किंचित स्वार्थी विचार न ठेवता एक स्वच्छ पद्धतीने जीवन जगणारे आणि संतांच्या विचारांची जनमानसांमध्ये पेरणी करणारे अशी ही मंडळी या आशीर्वादासाठी या ठिकाणी आहेत.
त्या सगळ्यांचे आशीर्वाद, मार्गदर्शन लवांडे यांना मिळेल याची मला खात्री आहे. त्यामुळे या अपेक्षा आहेत की एक अतिशय चांगलं अशा प्रकारचं पीठ या ठिकाणी उभं करावं, त्याची पूर्तता होईल अशी अपेक्षा करू.