अर्ज भरले, आता उमेदवारीसाठी थेट मुलाखत!! भावी संचालक लागले कामाला, छत्रपतीच्या निवडणुकीत अजित पवार घेणार इच्छुकांची शाळा…

इंदापूर : तालुक्यातील छत्रपती सहकारी साखर कारखान्या निवडणुकीत सध्या रंगात आली आहे. यामध्ये आता अर्ज माघार घेण्याची प्रक्रिया सुरु झाली असून अनेकांनी अर्ज देखील माघारी घेतले आहेत. असे असताना आता इच्छुकांना आता तोंडी परीक्षा द्यावी लागणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे ही तोंडी परीक्षा घेणार आहेत.
कारखान्याच्या संचालक मंडळाच्या 21 जागांसाठी सहाशे उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. त्यापैकी छाननी प्रक्रियेत 122 अर्ज अपात्र ठरले. तर काहींनी स्वतःहून माघार घेतली. आता इच्छुकांची तोंडी परीक्षा घेतली जाणार आहे. यात जर तुम्ही पास झालात तर आणि तरच तुम्हाला उमेदवारी देण्यात येईल. गुरुवारी 24 एप्रिल रोजी बारामती या इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या जाणार आहेत.
यामुळे उमेदवारी नेमकी कोणाला मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. संचालक मंडळाने समाधानकारक काम न केल्याने अजित पवारांनी थेट भर सभेत त्यांचे कान उपटले. गेल्या १० वर्षांपासून सत्तेवर असणाऱ्या संचालक मंडळाला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कार्यकर्ता मेळाव्याच्या भर सभेत इशारा दिला. तसेच विद्यमान संचालकांपैकी कोणी अर्जच भरू नका, असेही दादा म्हणाले होते.
सध्या कारखाना प्रचंड आर्थिक अडचणीतून जात आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राज्याचे क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे यांच्या राजकीय कारकिर्दीलाही याच कारखान्याच्या संचालक पदापासून सुरुवात झाली. मात्र कारखान्यात मोठा गोंधळ झाला. कामगार भरती, विकास, कर्ज, यामध्ये कोणतीही पारदर्शकता नसल्याने कारखाना अडचणीत आला.
सध्या अजित पवार आणि पृथ्वीराज जाचक यांच्या अपेक्षेला खऱ्या ठरणाऱ्या इच्छुकांच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडणार आहे. यासाठी दत्तात्रेय भरणे आणि पृथ्वीराज जाचक यांची भूमिका देखील निर्णायक असणार आहे. यामुळे या तोंडी परीक्षेत कोण पास होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याबाबत निवडणूक समन्वयक किरण गुजर आणि सर्वपक्षीय पॅनल प्रमुख पृथ्वीराज जाचक यांनी प्रसार माध्यमांना माहिती दिली आहे.