काका अजितदादांच्या स्वागतासाठी पुतण्या रोहित पवारांची बॅनरबाजी, राष्ट्रवादीत चाललंय काय? कर्जतमध्ये राजकीय घडामोडी..


कर्जत : सध्या राष्ट्रवादीतील एक घडामोड समोर आली आहे. काका अजित पवार यांच्या दौऱ्याच्या स्वागताचे बॅनर पुतण्या रोहित पवारच्या समर्थकांकडून करण्यात आली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीत नेमकं काय सुरू आहे, याची चर्चा रंगली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज कर्जत-जामखेड दौऱ्यावर आहेत.

पक्षाच्या फुटीनंतर हा त्यांचा या मतदारसंघातील पहिलाच दौरा आहे. या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जामखेड पोलीस स्टेशन रोडवर लागलेला एक बॅनर सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. कर्जत-जामखेडच्या पावन भूमीत सहर्ष स्वागत, स्वागतोत्सुक आमदार रोहित दादा पवार मित्रपरिवार आणि समस्त कर्जत जामखेडकर असा हा बॅनर रोहित पवार यांच्या नावाने लावण्यात आला आहे.

यामुळे सध्या याची जोरदार चर्चा सुरु आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर लोकसभा-विधानसभा निवडणुका पार पडल्या. या दोन निवडणुकानंतर राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू असतात. मात्र, दोन्ही गटांकडून या चर्चांना पूर्ण विराम लावण्याचा प्रयत्न केला जातो. अनेकदा अजित पवार शरद पवार यांच्याबाबत अनुकूल वक्तव्य करतात.

काही दिवसांपूर्वी चुलत्याच्या आशिर्वादाने बरं चाललंय असे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले होते. त्यानंतर काका-पुतण्याच्या राजकारणाबाबत तर्क लावण्यास सुरुवात झाली होती. सध्या रोहित पवार हे शरद पवार यांच्या गटात सक्रिय आहेत. अजित पवार यांच्याशी राजकीय मतभेद स्पष्ट आहेत. मात्र रोहित पवार यांच्या अनेक वक्तव्यामुळे देखील चर्चा होते.

आता रोहित पवार यांच्या नावाने अजित पवार यांच्या स्वागतासाठी लावण्यात आलेला बॅनर अनेकांच्या भुवया उंचावणारा ठरत आहे. मागील काही दिवसात शरद पवार आणि अजित पवार हे देखील एकत्र विविध बैठकीच्या निमित्ताने दिसून आले होते. त्यानंतर रोहित पवार आणि अजित पवार यांच्यात जवळीक असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

दरम्यान या सगळ्या पार्श्वभूमीवर रोहित पवार हे अजित पवार यांच्यासोबत जाणार का, याची चर्चा सुरू झाली आहे. काही दिवसांपासून जयंत पाटील यांच्यासोबत असलेल्या कथित वादामुळे शरद पवार रोहित पवारांवर नाराज असल्याच्या चर्चा सुरू होत्या. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!