सांगलीची प्रतीक्षा बांगडी ठरली पहिली महिला महाराष्ट्र केसरी…!
सांगली : काल महाराष्ट्रामध्ये पहिली महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धा पार पडली. सांगली येथे ही स्पर्धा झाली असून यामध्ये सांगलीची प्रतीक्षा बागडी पहिली महिला महाराष्ट्र केसरी ठरली आहे. अंतिम सामन्यात कल्याणी पाटीलला चितपट करून प्रतिक्षाने महाराष्ट्र केसरीचा बहुमान व चांदीची गदा मिळवली आहे. खरंतर राज्यात यंदा पहिल्यांदाच महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामुळे सर्वांचे या स्पर्धेकडे लक्ष लागून राहिले होते.
प्रतीक्षा बागडीने ऐतिहासिक विजय मिळवून सांगलीची मान उंचावली आहे. ती सध्या 21 वर्षाची असून तिने अनेक राष्ट्रीय स्पर्धांमध्ये पदके मिळवली आहेत. सांगलीमधील तुंग या छोट्याशा गावात ती राहते. खेलो इंडिया या प्रतिष्ठित स्पर्धेत देखील प्रतिक्षाने घवघवीत यश मिळवत रौप्य पदकाची कमाई केली होती.
राज्य कुस्तीगीर परिषद व सांगली जिल्हा तालीम संघातर्फे राज्यात या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. सांगली जिल्हा क्रीडा संकुलात ही स्पर्धा पार पडली. पर्वा (ता.23) पासून ही स्पर्धा सुरू झाली होते. याचे उद्घाटन हिंदकेसरी दीनानाथ सिंह यांच्या हस्ते झाले होते. सध्या सर्व स्तरांतून प्रतीक्षा बागडीच्या घवघवीत यशाबद्दल कौतुक केले जात आहे.