पुणे- शिरूर मार्गासाठी अर्थसंकल्पात अजित पवारांची मोठी घोषणा, कात्रजच्या मेट्रो- २ साठीही तरतूद, जाणून घ्या…

मुंबई : आज राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याचा अर्थसंकल्प मांडला. यावेळी त्यांनी अनेक घोषणा केल्या. यामध्ये पुणे ते शिरूर ५४ किलोमीटर लांबीचा ७ हजार ५१५ कोटी रुपयांचा उन्नत मार्गाचे प्रकल्प हाती घेण्यात येणार आहे. यामुळे येथील वाहतूक व्यवस्था सुधारणार आहे.
यामध्ये तळेगाव चाकण शिक्रापूर दरम्यान तळेगाव ते चाकण या २५ किलोमीटर अंतरावरील चार पदरी उन्नत मार्गाचे काम प्रस्तावित असल्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी सांगितले. पुणे शहरात ये जा करणारांची याठिकाणी संख्या जास्त आहे. यामुळे याठिकाणी मोठी वाहतूक कोंडी होत असते. या प्रकल्पासाठी ६ हजार ४९९ कोटी रुपये अपेक्षित आहेत.
तसेच पुण्यातील स्वारगेट ते कात्रज या मेट्रोच्या कामाला मान्यता मिळाली असून खडकवासला ते स्वारगेट ते हडपसर ते खराडी आणि नळस्टॉप वारजे आणि माणिकबाग या दोन मार्गिकांसाठी केंद्र सरकारला प्रस्ताव पाठविला असल्याचेही अजित पवार यांनी जाहीर केले आहे. यामुळे या कामाला देखील गती मिळणार आहे.
मुंबईतील वाहतुकीसाठी ६४ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. समृद्धी महामार्गाचे ९९ टक्के काम पूर्ण झाले आहे. त्या लगत ॲग्रो लॉजिस्टिक केंद्र होणार आहे. ही कामे देखील लवकरच उरकतील.
याठिकाणी कोल्ड स्टोरेज, गोडाऊन यांची सुविधा असणार आहे. त्यामुळे विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांना फायदा होणार आहे, असेही अर्थमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे. यामुळे येणाऱ्या काळात ही कामे उरकली तर विकासाला मोठी गती मिळणार आहे.