स्वारगेट बसमध्ये बलात्कार प्रकरणी अजित पवार आक्रमक, लाडक्या बहिणींना दिला शब्द, नेमकं काय म्हणाले?

पुणे : काल स्वारगेटमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथील बस स्थानकात एका 26 वर्षीय तरुणीवर बसमधे बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. 26 वर्षीय तरुणीवर पहाटे स्वारगेट एसटी स्टँडमध्ये उभ्या असलेल्या बसमध्ये बलात्कार करण्यात आला. यामुळे खळबळ उडाली आहे.

या घटनेने एकच संताप व्यक्त केला जात आहे. यावर उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी मोठं वक्तव्य केले आहे. अजित पवार म्हणाले, पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात आपल्या एका भगिनीवर झालेल्या बलात्काराची घटना अत्यंत दुर्दैवी, क्लेशदायक, सुसंस्कृत समाजातील सर्वांना संताप आणणारी, शरमेने मान खाली घालायला लावणारी आहे.
या गुन्ह्यातील आरोपीने केलेला गुन्हा अक्षम्य असून त्याला फाशीशिवाय दुसरी शिक्षा असू शकत नाही. मी स्वतः पुणे पोलीस आयुक्तांना यासंदर्भात व्यक्तिशः लक्ष घालून तपास करण्याचे, आरोपीला तात्काळ अटक करण्याचे निर्देश दिले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही हा गुन्हा गांभीर्याने घेतला असून पोलिसांना आवश्यक सूचना दिल्या आहेत. पोलिसांकडून आरोपीला लवकरात लवकर अटक केली जाईल आणि त्याला कायद्यानुसार कठोरात कठोर शिक्षा होईल, यासाठी राज्य शासन सर्व पावले उचलेल, हा विश्वास महाराष्ट्रातील माझ्या तमाम बंधू-भगिनी, मातांना देतो.

पीडित बहिणीला न्याय, मानसिक आधार, सर्वतोपरी मदत करण्याच्या सूचना महिला व बाल विकासमंत्री तसेच राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष यांना देण्यात आल्या आहेत, असेही अजित पवार म्हणाले. सध्या पोलिसांची पथके आरोपीच्या मागावर आहेत. हा नराधम आरोपी दत्तात्रय गाडे हा फरार झाला असून त्याचा शोध घेतला जातोय. यामुळे सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
याच स्वारगेट परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर रहदारी असते, अशातही आरोपीने या तरूणीवरती एसटी बस स्थानकामध्ये असे कृत्य केल्याने महिला सुरक्षित आहेत का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. याबाबत तपास सुरू आहे. तरूणी दुसऱ्या बसने घरी पोहोचली तेव्हा तिने हि घटना घरी सांगितली.
