भीषण अपघाताने सोलापूर हादरलं!! देवदर्शन करताना काळाची झडप, अपघात तिघांचा मृत्यू, 25 जखमी…

सोलापूर : येथून एक भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. सोलापूर-पुणे महामार्गावर मोहोळजवळ कंटेनर, मिनीबस आणि दुचाकीच्या विचित्र तिहेरी अपघात झाला. यामध्ये दुचाकीस्वारासह बसचालक आणि बसमधील महिला अशा तिघा जणांचा मृत्यू झाला. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.

यामध्ये १५ प्रवासी जखमी झाले आहेत. अपघातानंतर कंटेनरचालकाने पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्याच्याविरुद्ध ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत माहिती अशी की, भोर तालुक्यातील कुसगाव येथील १६ महिला मुलाबाळांसह मिनीबसमध्ये बसून अक्कलकोट, तुळजापूर आणि पंढरपूरच्या देवदर्शनासाठी आल्या होत्या.
या सर्वजणी सोलापूर-पुणे महामार्गावरून पंढरपूरच्या दिशेने जात होत्या. यावेळी मोहोळ तालुक्यातील कोळेगाव पाटीजवळ एका दुचाकीस्वाराला समोरून भरधाव वेगाने आलेल्या कंटेनरने धडक दिली आणि त्या पाठोपाठ पुढील मिनीबसला मध्यभागी जोरात धडक दिली.

हा भीषण अपघात झाल्यानंतर मोठी गर्दी झाली होती. यामध्ये दयानंद भोसले यांच्यासह बसचालक लक्ष्मण पवार आणि बसमधील प्रवासी महिला सपना मोहिते अशी अपघातात मृत्यू झालेल्या तिघांची नावे आहेत. याबाबत पोलीस तपास करत आहेत. या घटनेने मात्र कुटूंबाला मोठा धक्का बसला आहे.
