गाडी शिकताना घडला अनर्थ!! थेट विहिरीत कार गेल्याने तिघे बुडाले, दुर्घटनेत सख्ख्या भावांचा समावेश…

नागपूर : जिल्ह्यातील बुटीबोरी एमआयडीसी परिसरात एक धक्कादायक घटना घडली. याठिकाणी कार शिकत असताना झालेल्या भीषण अपघातात तीन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली. रात्री तीन तरुण कारमध्ये जात असताना रस्त्यालगत असलेल्या कठडा नसलेल्या विहिरीत कार गेली.

या घटनेच्या ठिकाणी इतर कोणी उपस्थित नसल्याने विहिरीत कार पडली आणि ती पूर्णपणे बुडून तिघेही तरुण तिथेच बुडून मृत्यूमुखी पडले. तरुण गाडी शिकत असल्याची माहिती समोर आली आहे. अपघाताच्या वेळी तीन तरुण एका कारमध्ये बसले होते, त्यातील एक तरुण कार चालवणे शिकत होता.
यावेळी कारचे नियंत्रण अचानक गमावल्याने ते रस्त्यालगत असलेल्या उघड्या विहिरीत पडले. विहिर पंधरा फूट होती, ज्यामुळे कार आणि त्यात अडकलेले तरुण तिथेच बुडून गेले. त्यांना गाडीतून बाहेर पडता आलं नाही. सुरज सिद्धार्थ चव्हाण, साजन सिद्धार्थ चव्हाण आणि त्यांचा मित्र संदीप चव्हाण असे मृतकाचे नाव आहे.

अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी लगेच बुटीबोरी पोलीस, अग्निशमन दल आणि आपत्कालीन मदत संस्थांना कळवले. विहिरीतून कार बाहेर काढली. परंतु, त्यावेळी तिघांचा मृत्यू झाला होता. या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर त्यातील एक तरुण शिकवणी घेत असताना कार चालवायचा प्रयत्न करत होता, असे सांगितले जात आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने मदत कार्य सुरू केले. पोलीस घटनास्थळी तपास करत असून, त्यांच्याकडून अधिक माहिती मिळवण्यासाठी तपास सुरू आहे. या अपघातामुळे कुटुंबीय आणि स्थानिक नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.