दमानिया यांनी करोडोंचा घोटाळा बाहेर काढला अन् धनंजय मुंडे तातडीने अजित पवारांला भेटायला गेले, आता राजीनामा अंतिम टप्प्यात?

बीड : येथील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. असे असताना अंजली दमानिया यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. कृषिमंत्री असताना त्यांनी घोटाळा केला असल्याचे पुरावे त्यांनी आज दिले आहेत.

मुंडे हे मागील सरकारमध्ये कृषीमंत्री असताना त्यांनी ८८ कोटी रूपयांचा घोटाळा केल्याचे पुरावे दमानिया यांनी पत्रकार परिषदेत मांडले. यानंतर मोठी खळबळ उडाली आहे. हा आरोप झाल्यानंतर धनंजय मुंडे हे तातडीने पक्षप्रमुख अजित पवार यांच्या भेटीला गेले आहेत, असे वृत्त एका मराठी वृत्तवाहिनीने दिले आहे.
अंजली दमानिया यांनी आज जे कृषी घोटाळ्याचे आरोप केले, त्यानंतर धनंजय मुंडेच नव्हे, तर महायुती सरकारची प्रतिमा मलिन होण्याची शक्यता आहे. आज सकाळी ११ वाजता अंजली दमानिया यांनी ही पत्रकार परिषद घेतल्यानंतर ती संपत असतानाच धनंजय मुंडे हे तातडीने अजित पवार यांच्या भेटीला पोहोचले. आता अजित पवार कोणती भूमिका घेणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

आज दुपारी राज्य मंत्रिमंडळाची सुद्धा मंत्रालयात बैठक आहे. मात्र, या बैठकीपूर्वीच मुंडे यांनी अजित पवारांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. मागील वेळेला परळी थर्मल पॉवरमधील राखेतून धनंजय मुंडे, वाल्किम कराड आणि राजश्री मुंडे यांच्या कंपनीने कोट्यवधी रूपये कमावल्याचा आरोप अंजली दमानिया यांनी केला होता.
दरम्यान, संतोष देशमुख हत्याप्रकरणात धनंजय मुंडे यांचा थेट सहभाग किंवा त्यांच्यावर कोणताही थेट आरोप नसल्याचे म्हणत अजित पवार यांनी मुंडेंना अभय देत मंत्रिपदाचा राजीनामा घेण्यास नकार दिला होता.