थेऊर गोळीबार प्रकरणातील महिलेचा अखेर मृत्यू, प्लॉटिंगवर लघुशंका केल्या प्रकरणी घडली होती घटना…

उरुळी कांचन : लघुशंका करतांना हटकल्याने तिघा जणांच्या टोळक्याने वॉचमनसह त्याच्या पत्नीला दगडाने आणि हाताने बेदम मारहाण करून हवेत गोळीबार केल्याची घटना घडली होती. यात नवरा बायको गंभीर जखमी झाले होते. त्यात जखमी झालेल्या महिलेचा आता उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

ही घटना थेऊर (ता.हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील जय मल्हार हॉटेल जवळ शुक्रवारी (ता. २७) रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडली होती. या घटनेत जखमी झालेल्या महिलेचा लोणी काळभोर (ता. हवेली) येथील विश्वराज हॉस्पिटलमध्ये आज बुधवारी (ता.१) दुपारी उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

शीतल अक्षय चव्हाण (वय.३२ रा. चव्हाणवस्ती, थेऊर ता. हवेली) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. या गुन्ह्यात पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. सतीश बारीकराव लोखंडे (वय ३१, अजय दशरथ मुंढे (वय.२६), भानुदास दत्तात्रय शेलार (वय.३२ सर्व रा. चिंबळी फाटा, ता. खेड, जि. पुणे) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी अक्षय साहेबराव चव्हाण (वय.३१) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे-सोलापूर महामार्गावर थेऊर परिसरात जय मल्हार हॉटेलजवळ मोकळ्या जागेत अक्षय हा सुरक्षारक्षक आहे. अक्षय आणि त्याची पत्नी शीतल तेथे राहायला आहेत. शुक्रवारी सकाळी सव्वाआठच्या सुमारास कारमधून आरोपी आले. ते मोकळ्या जागेत लघुशंका करत होते.
तसेच रखवालदार चव्हाण याने त्यांना हटकले. त्यानंतर आरोपींनी त्याला शिवीगाळ केली. चव्हाणला मारहाण करून त्याला दगड फेकून मारला. चव्हाणची पत्नी शीतलने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. आरोपींनी फेकून मारलेला दगड तिला लागल्याने तिच्या डोक्याला आणि पायाला लागून ती गंभीर जखमी झाली.
दरम्यान, या वेळी आरोपींनी चव्हाण याच्या दिशेने पिस्तुलातून गोळीही झाडली. दरम्यान बुधवारी उपचारादरम्यान शीतल यांचा मृत्यू झाला. शीतल यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठविण्यात आला होता. या वेळी पोलिसांनी मोठा बंदोबस्त रुग्णालय परिसरात ठेवला होता.
