Ranjitsinh Mohite Patil : मोठी बातमी! रणजितसिंह मोहिते पाटील यांना भाजपकडून शिस्तभंगाची नोटीस, नेमकं कारण काय?


Ranjitsinh Mohite Patil : भाजपचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्यावर पक्षाच्या वतीने शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली आहे. भाजपने रणजितसिंह मोहिते पाटील यांना कारणे दाखवा नोटीस पाठवली आहे. पुढील सात दिवसात पाटलांनी आपली भूमिका मांडण्यात अवधीही देण्यात आला आहे.

पश्चिम महाराष्ट्रात स्वत:चा जोर वाढवण्यासाठी शरद पवारांनी लोकसभा निवडणुकीत माढ्यातून रणजितसिंह मोहिते पाटील यांचे धाकडे बंधू धैर्यशील मोहिते पाटील यांना संधी दिली होती. माढा मतदारसंघात लोकसभेसाठी रणजितसिंह मोहिते पाटील इच्छुक होते.

मात्र त्यांना डावलत भाजपने रणजितसिंह निंबाळकर यांना संधी दिली होती. त्यामुळे रणजितसिंह मोहिते पाटील नाराज होते. लोकसभा निवडणुकीत ते सायलंट राहून धाकट्या भावासाठी प्रचार करीत असल्याचाही आरोप केला जात होता. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत त्यांनी भाजपसाठी प्रचार केला नसल्याचीही माहिती आहे.

भाजपचे प्रदेश कार्यालयीन सचिव मुंकुद कुलकर्णी यांच्या सहीने आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांना ही कारणे दाखवा नोटीस देण्यात आली आहे. दरम्यान, रणजितसिंह मोहिते पाटील यांना आठ मुद्यांवर शिस्तभंग केल्यासंदर्भात विचारणा करण्यात आली आहे.

त्यावर येत्या सात दिवसांत खुलासा करण्याचे आवाहन मोहिते पाटील यांना करण्यात आले आहे. त्यावर रणजितसिंह मोहिते पाटील काय उत्तर देतात, याकडे सोलापूरच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे. Ranjitsinh Mohite Patil

लोकसभा निवडणुकीत माढ्यातून धैर्यशील मोहिते पाटील यांना डावलून भाजपने रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना तिकिट दिले होते. तेव्हापासून आमदार रणजितसिंह मोहिते पाटील हे भाजपपासून लांब होते. विशेष म्हणजे तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेपासूनही ते लांब राहिले होते. मात्र, लोकसभा निवडणुकीनंतर पुण्यात झालेल्या भाजप प्रदेश अधिवेशनाला मात्र त्यांनी हजेरी लावली होती.

लोकसभा निवडणुकीनंतर अकलूजमध्ये झालेल्या महाविकास आघाडीतील खासदारांच्या सत्कार समारंभाला ही रणजितसिंह मोहिते पाटील यांची उपस्थिती होती. त्या व्यासपीठावरून त्यांनी सोलापूरच्या विकासासाठी आपण कोणतीही तडजोड करायला तयार आहे, असे जाहीर विधान केले होते. त्यामुळे मोहिते पाटील यांच्या विरोधात भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून तक्रारी झाल्या होत्या.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!