Manorama Khedkar : मनोरमा खेडकर यांनी पिस्तूल मुळशीत दाखवला अन् नगरमध्ये शेतकरी म्हणाले, खेडकर यांच्यावरच शेतकऱ्यांनी हल्ला केला, नेमकं खरं काय?

Manorama Khedkar : पूजा खेडकरची आई मनोरमा खेडकरला पुणे ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. मनोरमा खेडकरचे काही दिवसांपुर्वी स्थानिक शेतकऱ्यांना धमकावतानाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल झाले होते. पुणे पोलिसांशी देखील त्यांनी हुज्जत घातली होती. गेल्या काही दिवसांपासून मनोरमा खेडकरचा तपास पोलिस करत होते.
आज अखेर पोलिसांनी मनोरमा खेडकरला महाड मधील हॉटेल मधून अटक केली आहे. स्थानिक पोलीस ठाण्यात नोंद करुन पोलिस त्यांना पुण्याला घेऊन येत आहेत. मनोरमा खेडकर हॉटेलमध्ये लपून बसल्याची माहिती आहे.
मुळशीतल्या जमिनीसंदर्भात डॉ. मनोरमा खेडकर यांनी पिस्तूल उभारून आम्हाला दमदाटी केली, जमीन हडप करण्याचा प्रयत्न केला, असा आरोप मुळशीतल्या शेतकऱ्यांनी केला होता.
पोलीस दखल देत नाहीत असे त्यांचा आरोप होता. पोलिसांनी गुन्हा दाखल केला नाही असाही आरोप होता. हे प्रकरण उघड झाल्यानंतर आता खेडकर यांचे मूळ गाव असलेल्या नगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील भालगावचे गावकरी जागे झाले आहेत.
खेडकर यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न…
या गावकऱ्यांनी कांगावा केला आहे की, मुळशीत काही गुंडांनी डॉक्टर खेडकर यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्यावर कारवाई झाली नाही, तर आम्ही आंदोलन करू. पाच जून २०२३ रोजी हा प्रकार घडल्याचे निवेदन अहमदनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांना भालगावच्या गावकऱ्यांनी दिले आहे.
या निवेदनात नमूद केल्यानुसार पाच जून २०२३ रोजी मुळशी परिसरातील काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी काठ्या व धारदार हत्यारे घेऊन मनोरमा खेडकर यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. तब्बल वीस मिनिटे हा सगळा प्रकार सुरू होता.
तेव्हा जीव वाचवण्यासाठी मनोरमा यांनी पिस्तूल काढला, तेव्हा कुठे जमाव बाजूला झाला. या साऱ्या प्रकरणात खेडकरांची नाहक बदनामी सुरू असून खरी बाजू लपवली जात असल्याचे या गावकऱ्यांनी निवेदनात नमूद केले आहे. दरम्यान मुळशीत घडलेल्या प्रकारासंदर्भात मनोरमा खेडकर यांच्या पिस्तूलचे लायसन रद्द करण्याबाबत कारणे द्या अशी नोटीस बजावण्यात आली आहे. त्यात आता गावकरी खेडकर यांच्या बाजूने उतरले आहेत.