Pune Crime : येरावड्यात सराईत गुन्हेगारावर कोयत्याने वार करून खून, तिघांना अटक, पूर्ववैमनस्यातून घटना…


Pune Crime : दिवसागणिक पुण्यातली गुन्हेगारी वाढते आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. कोयता घेऊन रस्त्याने फिरणे, टोळा धाडी, गाड्या जाळणे एवढंच नाही तर शुल्लक रकमेसाठी हात तोडण्यासारख्या अंगावर काटा आणणारे प्रकार सध्या पुण्यात वेगात वाढले आहेत.

येरवड्यात पूर्ववैमनस्यातून एका सराईत गुन्हेगाराचा तिघांनी धारदार कोयत्याने सपासप वार करुन खून केला. ही घटना बुधवारी (ता.१७) पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास गोल्फ चौकाजवळ हॉटेल साई जायका शेजारी घडली.

सुधीर चंद्रकांत उर्फ बाळू गवस (वय.२३. जयप्रकाश नगर, माऊली दुकानाच्या मागे येरवडा, पुणे) असे खून झालेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. याप्रकरणी प्रवीण रामचंद्र आचार्य (वय. ४४), स्वप्निल प्रवीण आचार्य (वय.२८), रवी रामचंद्र आचार्य (वय.३५ सर्व राहणार जयप्रकाश नगर, माऊली दुकानाच्या मागे, येरवडा, पुणे) यांच्यावर गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.

याप्रकणी गौरी धर्मेंद्र शिंदे (वय.३५ राहणार जयप्रकाश नगर, माऊली दुकानाच्या मागे येरवडा पुणे) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

सविस्तर माहिती अशी की, सुधीर गवस याचे आचार्य कुटुंबासोबत पूर्वीचे वाद होते. गवस याच्यावर मारहाणीसह विविध गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल होते. काही दिवसांपूर्वीच तो जेलमधून सुटला होता. मंगळवारी रात्री जुन्या वादातून त्यांची भांडणे झाली होती.

आचार्य कुटुंबीयांनी हत्यारासह त्याचा पाठलाग सुरू केला. पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास सुधीर हा गोल्फ चौकाजवळ हॉटेल साई जायका शेजारी लपून बसलेला असताना त्याला तिघांनी गाठले. त्याच्यावर धारदार कोयत्याने डोक्यात व शरीरावर वार केले.

या हल्ल्यात सुधीर गंभीर जखमी झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.घटनेची माहिती मिळताच येरवडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करुन अटक केली. या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!