Eknath Shinde : लाडकी बहीणनंतर मुख्यमंत्र्यांनी लाडक्या भावांनाही केलं खुश, केली मोठी घोषणा, दरमहा १० हजार मिळणार….
Eknath Shinde : महाराष्ट्रात सध्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ या योजनेची जोरदार चर्चा सुरु आहे. या योजनेच्या माध्यमातून राज्य सरकार महिलांना दर महिन्याला १५०० रुपये देणार आहे. लाडकी बहीण योजनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी युवा भाऊरायांसाठीही महत्त्वाची घोषणा केली आहे.
पंढरपुरात विठुरायाची महापूजा केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी विद्यार्थ्यांसाठीही खास योजना जाहीर केली. त्यानुसार बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना दरमहा सहा हजार रुपये, डिप्लोमाधारक विद्यार्थ्यांना दरमहा आठ हजार रुपये, तर पदवीधर युवकांना दरमहा दहा हजार रुपये स्टायपंड मिळू शकते.
आषाढी एकादशीच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंढरपुरात विठुरायाची सपत्नीक शासकीय महापूजा केली. यावेळी त्यांनी पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने आयोजित कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक कृषी पंढरी महोत्सवाचं उद्घाटनही केलं.
सोलापूरचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत कार्यक्रमात बोलताना एकनाथ शिंदे यांनी विद्यार्थ्यांसाठी एका योजनेची घोषणा केली. Eknath Shinde
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, आपल्या सरकारने महिलांसाठी लाडकी बहीण योजना आणली. या अंतर्गत राज्यातील महिलांना दरमहा १,५०० रुपये, म्हणजेच वर्षाकाठी १८ हजार रुपये दिले जातील.
याशिवाय त्यांना दरवर्षी तीन गॅस सिलेंडर मिळणार आहेत. लाडकी बहीण योजनेचे पैसे लवकरच महिलांच्या खात्यात वळवले जातील, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
लोकांनी आमच्यावर टीका केली की, लाडक्या बहिणीसाठी योजना आणली, पण लाडक्या भावांचं काय? लाडक्या भावांकडेही आमचं लक्ष आहे.आम्ही त्यांच्यासाठीही एक योजना आणत आहोत. जे तरुण बारावी पास झाले आहेत, त्यांना दरमहा सहा हजार रुपये, डिप्लोमाधारक तरुणांना आठ हजार, तर पदवीधर तरुणांना महिन्याला १० हजार रुपये दिले जातील. असे ते म्हणाले.