Lok Sabha Election : पाणी द्या मगच गावात या! लोकसभा निवडणुकीवर माळशिरसच्या ग्रामस्थांचा बहिष्कार….
Lok Sabha Election : आगामी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा तसेच नेत्यांना गावबंदी करण्याचा एकमुखी निर्णय माळशिरस येथील ग्रामस्थांनी घेतला आहे. पुरंदर उपसा जलसिंचन योजनेची पाणी मागणी असूनही माळशिरस गावचे पाणी बंद केल्याने गावाला पिण्याचे पाणी नसल्याने पाणी न मिळाल्यास हा निर्णय घेण्यात आला आहे.
याबाबत माळशिरस ग्रामस्थांनी सोमवारी पुरंदर उपसा योजनेच्या सासवड येथील कार्यालयात आंदोलन केले. शेतकरी प्रवीण कामठे यांनी पुरंदर उपसा योजनेच्या पाण्यासाठी कार्यालयात अंगावर डिझेल ओतून निषेध व्यक्त केला. याबाबत आता ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत.
यावेळी ग्रामस्थ व पोलिसांनी वेळीच आवरल्याने पुढील अनर्थ टळला. आंदोलन करूनही पाणी न मिळाल्याने माळशिरस ग्रामस्थांनी मंगळवारी तातडीची गाव बैठक बोलावली. यात जोपर्यंत पुरंदर उपसा जलसिंचन योजनेचे पाणी मिळत नाही तोपर्यंत आगामी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकणार असल्याचे सर्वांनी सांगितले. Lok Sabha Election,
यावेळी कोणत्याही नेत्याला गावात येऊ देऊ नये, असाही निर्णय घेण्यात आला. पाणी न मिळाल्यास आंदोलनाची पुढची दिशा म्हणजे माळशिरस ग्रामस्थांच्या वतीने जेजुरी पोलिस स्टेशनला निवेदन देऊन वाघापूर चौफुला येथे रास्ता रोको आंदोलन करण्याचा गाव बैठकीत निर्णय घेण्यात आला.
यावेळी गावचे उपसरपंच अशोक यादव, माळशिरस सोसायटीचे चेअरमन सदाशिव डोंबाळे, युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष माऊली यादव, ग्रामपंचायत सदस्य शरद यादव, सुखदेव मराठे, दीपक यादव, नवनाथ यादव, दादा यादव, शिवसेनेचे संतोष यादव, तसेच माळशिरस ग्रामस्थ उपस्थित होते.