Pune : अजित पवार गटातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याचा मुलावर टोळक्याचा कोयत्याने हल्ला; दांडेकर पूल परिसरातील घटना

पुणे : अजित पवार गटातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याचा मुलावर दहा ते बारा जणाच्या टोळक्याने कोयत्याने हल्ला केला. तर त्याच्या दोन मित्राना कोयत्याने मारहाण केल्याचा प्रकार दांडेकर पूल येथून समोर आला आहे.
मयूर राम पालखे ( वय.२५, रा.दांडेकर पुल) यांनी पर्वती पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. याप्रकरणी धर्मादास कदम, चंद्रकांत कदम निलेश कदम, अनिल लोंढे आणि त्यांच्या इतर साथीदारांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, मयूर पुणे पालिकेत काम करीत आहेत. तर त्यांचे वडील राम पालखे हे सामाजिक कार्यकर्ते असून ते अजित पवार गटातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी आहेत. मयूर हे घरी निघाले होते. त्यावेळी आरोपीचा नातेवाईक असलेल्या एका मुलाने त्यांना धक्का दिला, त्याचा जाब मयूर यांनी विचारला होता. जाब विचारल्यानंतर तो मुलगा निघून गेला.
यानंतर मध्यरात्री एकच्या सुमारास सर्वांनी एकत्र येत मयूर यांच्यावर हल्ला केला. उलटा कोयता आणि लाथा बुक्यांनी बेदम मारहाण करण्यास सुरूवात केली. त्यावेळी हे वाद सोडवण्यास आलेल्या मित्र व नातेवाईकांना या टोळक्याने मारहाण केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
दरम्यान, पुढील तपास पोलीस करत आहेत.