देवदर्शनावरून परत येत असताना टेम्पो ट्रॅव्हलरवर अंदाधुंद गोळीबार; चालकासह ४ प्रवासी जखमी

नागपूर : नागपूर येथील तीन ते चार कुटुंब शेगाव येथे दर्शनासाठी गेले होते. शेगाव येथून गजानन महाराजांचे दर्शन घेऊन ते सर्व परत येत असतांना त्यांच्या ट्रॅव्हलर वाहनावर काल रविवार (ता. ११) रात्री बारा वाजण्याच्या सुमारास अंदाधुंद गोळीबार केल्याने चालकासह ४ प्रवासी जखमी झाल्याची धक्कादायक घटना नांदगाव पेठ पोलिस स्टेशन हद्दीतुन समोर आली आहे.

गोळीबा केल्यानंतर संशयीत आरोपी घटनास्थळावरून पसार झाला आहे. या घटनेत चालकासह अन्य चार प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, टेम्पो ट्रॅव्हलर क्रमांक एम एच १४ जीडी ६९५५ ने नागपूर येथील तीन ते चार कुटुंब शेगाव येथे दर्शनासाठी गेले होते. त्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांसह महिला, पुरुष आणि लहान बालके देखील होती. शेगाव येथून गजानन महाराजांचे दर्शन घेऊन ते सर्व परत येत होते.

अमरावती ओलांडून त्यांचे वाहन नागपूरच्या दिशेने नांदगाव पेठ पोलिस स्टेशन हद्दीत आले असता अज्ञात संशयीत आरोपींनी बोलेरो वाहनातून टेम्पो ट्रॅव्हलरला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला आणि अचानक चालक व प्रवाशांच्या दिशेने असलेल्या खिडकीवर अंदाधुंद गोळीबार करायला सुरुवात केली होती.
एकाएकी गोळीबार करण्यात आल्यामुळे चालकासह वाहनातील प्रवासी भयभीत झाले होते. चालकाने प्रसंगावधान राखत आपले वाहन रस्त्यात मध्ये कुठेही न थांबवता थेट तिवसा पोलिस स्टेशन गाठले आणि तेथे सर्व घटनाक्रम सांगितला.
दरम्यान, जखमींना तिवसा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक करत आहेत.