पुरंदर तालुक्यातील मावाडी गावात कांदा, लसणाच्या शेतात लावली अफूची झाडे, पोलिसांची कारवाई! दोघांना अटक..

पुणे : पुरंदर तालुक्यातील कोडीत बुद्रुक येथील मलाईवस्ती परिसरातून काही दिवसापूर्वी १० किलो अफू जप्त करण्यात आले होते. त्यानंतर आज (ता. ०४) पुन्हा पुरंदरमधील मावाडी गावातून पाऊण लाख रुपये किमतीची ३८ किलो अफूची बोंडे जप्त करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.
किरण कुंडलिक जगताप (वय ४०) आणि रोहिदास चांगदेव जगताप (वय ५५, दोघे रा. कोडित बुद्रुक, ता. पुरंदर, जि. पुणे) यांच्यावर जेजुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून यांना अटक करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांना पुरंदर तालुक्यातील मावाडी गावात अफूची लागवड केल्याची माहिती मिळाली आहे. ज्यानंतर त्यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने जेजुरी आणि भोर पोलिसांच्या सहकार्याने ही कारवाई केली आहे. कांदा आणि लसणाच्या पिकांमध्ये अफूची झाडे लावण्यात आल्याचे दिसून आले आहे.
पाच दिवसांपूर्वीच पोलिसांनी पुरंदर तालुक्यातील कोडीत बुद्रुक येथील मलाईवस्ती परिसरात अफूची शेती केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल केला होता. त्यावेळीही शेतातून आठ किलो अफूची झाडे जप्त करण्यात आली होती. २८ फेब्रुवारीला केलेल्या छापेमारीत पोलिसांनी अफूची १० झाडे जप्त केली होती. या प्रकरणात पोलिसांनी दशरथ सिताराम बडदे आणि तानाजी निवृत्ती बडधे या दोघांना अटक केली होती.
दरम्यान, अफूची बोंडे जप्त करण्यात आली असून दोन जणांना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक करत आहेत.