Pune News : ‘.. नाहीतर मुलाचा मृत्यू होईल’, पुण्यात जादूटोण्याच्या बहाण्याने लुटले ३५ लाख

Pune News पुणे : विद्येचे माहेरघर, सुसंस्कृतांचे शहर अशी ख्याती असलेल्या पुण्यातून एक धक्कादायक, अघोरी प्रकार समोर आला आहे. आजारातून बरं करण्यासाठी जादूटोणा केल्याचा प्रकार पुण्यातील चंदननगर परिसरातून समोर आला आहे.

मुलाला मानसिक आजारातून बरं करण्यासाठी जादूटोणा करण्यात आल्याची घटना उघड झाली आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे त्यासाठी पीडित कुटुंबाकडून तब्बल ३५ लाख रुपये उकळण्यात आल्याची माहिती आहे.


एवढेच नव्हे तर आरोपी मारणे याने पीडित कुटुंबियांकडे आणखी ५० लाख रुपयांची मागणी केली. हे पैसे दिले नाहीत तर तुमच्या मुलाचा आणि पतीचा मृत्यू होईल, तुमच्या घराचा नायनाट होईल असे बोलून फिर्यादीला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले.
याप्रकरणी पीडित महिलेने चंदन नगर पोलीस स्टेशन फिर्याद दाखल केली होती. त्यानतंर पोलिसांनी चार जणांविरोधात नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट अघोरी प्रथा जादूटोणा प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला.
दरम्यान, पुण्यात वारंवार असे प्रकार घडत असल्याने चिंता व्यक्त केली आहे. काही दिवसांपूर्वीच प्रतिस्पर्धी मित्राचा मृत्यू होण्याकरता स्मशान भूमीमध्ये जाऊन अघोरी पूजा करून, पूजेचा व्हिडिओ मित्राला पाठवून देण्याचा धक्कादायक प्रकार लोणी काळभोर हद्दीमध्ये घडला होता.
त्यातच आता ही नवी अघोरी पूजेची नवी घटना उघडकीस आली आहे. या घटनेने पुन्हा एकदा पुण्यात खळबळ उडाली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.
