Ravindra Waikar : ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकरांच्या घरावर ईडीची छापेमारी, नेमकं प्रकरण काय?, जाणून घ्या..

Ravindra Waikar : ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांच्या घरी सकाळपासून ईडीची रेड सुरू झाली. रवींद्र वायकर यांच्या मातोश्री क्लब आणि घरी अशा एकूण चार ठिकाणी ईडीकडून छापेमारी सुरू करण्यात आली आहे. मंगळवारी (ता.९) सकाळी साडेसात वाजेपासून ईडीचे ८ ते १० अधिकारी वायकर यांच्या घरी व कार्यालयात तपासणी करीत आहेत.

त्यांचे भागीदार असलेल्या व्यक्तींच्या घरी व कार्यालयातही ईडीची अधिकारी चौकशी करीत आहेत. जोगेश्वरी येथील भूखंड गैरवापर प्रकरणी ईडीनं ही कारवाई केली आहे. एकूण ७ ठिकाणी ईडीकडून छापेमारी करण्यात आली आहे.
भूखंडाचा गैरवापर तसेच तथ्य लपवून त्या ठिकाणी पंचतारांकित हॉटेल बांधण्यास परवानगी मिळवल्याचा आरोप ईडीने केला आहे. रवींद्र वायकर यांच्याविरोधात यापूर्वी ईडीने गुन्हा दाखल केला आहे. वायकर यांच्यावर बेकायदेशीरपणे हॉटेल बांधल्याचा आरोप आहे.

जोगेश्वरी येथे पंचतारांकित हॉटेल उभारण्यासाठी वायकर यांनी पालिकेचा भूखंड हडप केल्याचा आरोप आहे. हा ५०० कोटींचा कथित घोटाळा असल्याचे म्हटलं जात आहे. या प्रकरणी वायकर यांना ईडीकडून चौकशीला बोलावले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. Ravindra Waikar
दरम्यान, रवींद्र वायकर यांच्या विरोधात भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आरोप केला होता. जोगेश्वरी येथील हॉटेल संदर्भात ही तक्रार होती. मुंबई महापालिकेच्या राखिव भूखंडावर वायकर यांनी पंचतारांकित हॉटेल बांधली आहे. त्याची परवानगी वायकर यांनी पालिकेकडून घेतली नव्हती. हा सुमारे ५०० कोटी रुपयांचा घोटाळा असल्याचा दावा सोमय्या यांनी त्यांच्या तक्रारीत केला होता.
आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे ही तक्रार करण्यात आली होती. त्याची गंभीर दखल घेऊन आर्थिक गुन्हे शाखेनं वायकर यांना चौकशीसाठी बोलावलं होतं. वायकर चौकशीला उपस्थित राहिले होते. त्यानंतर आता वायकरांच्या अडचणीत वाढ झाली असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.