Crime News : आई फोनवर बोलत असताना बाळ लागलं रडायला, आईने केली हत्या, घटनेने सगळेच हादरले..

Crime News : आई आणि मुलाचे नाते हे खूप सुंदर असते. मात्र याच नात्याला काळिमा फासणारी एक भयंकर घटना समोर आली आहे. झारखंडच्या गिरिडीहमध्ये एका आईने तिच्या बाळासोबतच भयानक कृत्य केलं आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिक संताप व्यक्त करत आहेत.

बाळ सतत रडत असल्यामुळं वैतागलेल्या आईनेच त्याचा निर्घण खून केला आहे. आई फोनवर बोलत असताना बाळ सतत रडत होतं. त्यामुळं बोलण्यात व्यत्यय येत होता. या रागातून तिने पोटच्या मुलाचा गळा घोटून जीव घेतला.
दोन वर्षांच्या मुलाला त्याच्याच आईने दिलेली शिक्षा पाहून परिसरातील नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. तसेच, महिलेला कठोर शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे. गोलगो या गावातील ही घटना आहे.

मिळालेल्या माहिती नुसार, निजामुद्दीनचे सहा वर्षांपूर्वी अफसाना खातून या महिलेसोबत लग्न झाले होते. निजामुद्दीन मुकबधिर आहे. लग्नानंतर त्याला दोन मुलं झाली. मोठा मुलगा चार वर्षांचा आहे तर लहान मुलगा दोन वर्षांचा आहे.
गुरुवारी दोघा पती-पत्नींमध्ये एका क्षुल्लक कारणांवरुन वाद झाले. त्यानंतर तिने पतीला एका खोलीत बंद करुन ठेवले आणि ती बाहेरच्या खोलीत घेऊन बसली होती. तिने दरवाजा बंद ठेवला होता.
कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, महिला एका व्यक्तीशी फोनवर बोलत होती. त्याचवेळी तिचा दोन वर्षांचा मुलगा रडत होता. पण त्याला शांत करण्याऐवजी महिला संतापली आणि तिने पोटच्याच लेकाची गळा दाबून हत्या केली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
