Sukhdev Singh Gogamedi : राजस्थानमध्ये खळबळ! दिवसाढवळ्या करणी सेनेच्या प्रमुखाची हत्या, राज्यात आज बंदची हाक, पोलिसांचा फौजफाटा तैनात…

Sukhdev Singh Gogamedi : राजस्थानची राजधानी जयपूरमध्ये राष्ट्रीय राजपूत करणी सेनाचे अध्यक्ष सुखदेव सिंह गोगामेडी यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. आता या हत्येनंतर राज्यात तणाव वाढला आहे.

हल्लेखोरांनी गोगामेडी यांच्यावर चार गोळ्या झाडल्या. हल्ल्यानंतर त्यांना तातडीने मानसरोवर येथील तातडीने मेट्रो रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचाराच्या आधीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले. Sukhdev Singh Gogamedi
जयपूरसह विविध ठिकाणी निदर्शने झाल्याची माहिती आहे, तर चुरूमध्ये सरकारी बसवर दगडफेक करण्यात आली. यासोबतच सुखदेव सिंह गोगामेडी यांच्या हत्येच्या निषेधार्थ राष्ट्रीय राजपूत करणी सेना आणि राजस्थानमधील इतर समुदायांनी बुधवारी म्हणजेच आज राज्यव्यापी बंदची घोषणा केली आहे.

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे अध्यक्ष सुखदेव सिंह गोगामेडी यांच्या जयपूर येथील निवासस्थानी झालेल्या हत्येची न्यायालयीन चौकशी करण्याच्या मागणीसाठी ‘बंद’ पुकारण्यात आला आहे.
यापूर्वी जयपूरमध्ये राजपूत करणी सेनेच्या समर्थकांनी रस्त्यावर उतरून सुखदेव सिंग गोगामेडी यांच्या हत्येबद्दल संताप व्यक्त केला होता. मेट्रो मास हॉस्पिटलबाहेर निदर्शने झाली आणि मानसरोवरात रस्ते अडवण्यात आले.
तसेच या हत्याकांडावर राजस्थानचे डीजीपी उमेश मिश्रा म्हणाले की, राजपूत करणी सेनेचे प्रमुख सुखदेव सिंह गोगामेडी यांची जयपूरमध्ये हत्या करण्यात आली. मारेकरी चर्चा करण्याच्या बहाण्याने त्याच्या घरी आले होते.
या घटनेत सुखदेव सिंग गोगामेडी यांचा मृत्यू झाला असून त्यांचा एक अंगरक्षक जखमी झाला आहे. मारेकऱ्यांसोबत असलेल्या एका आरोपीचाही गोळी झाडून मृत्यू झाला.
हल्लेखोरांच्या संभाव्य अड्ड्यांवर छापे टाकण्यात येत आहेत. या हत्येची जबाबदारी रोहित गोदरा टोळीने घेतली असून त्यांना लवकरच अटक करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. आम्ही हरियाणाच्या डीजींकडेही मदत मागितली आहे. असेही हे म्हणाले आहेत.
