Uruli Kanchan : वर्षानंतर ‘एनएचएआय’ला जाग! कवडीपाट ते कासुर्डी राष्ट्रीय महामार्गावरील अतिक्रमणे हटविणार..!!

Uruli Kanchan उरुळीकांचन : पुणे- सोलापूर राष्ट्रीय महामार्ग (क्र. ६५) च्या कासुर्डी ते कवडीपाट रस्त्यावरील अतिक्रमणे व विना परवाना बांधकाम दि.५ डिसेंबर ) पर्यंत काढून टाकण्याची ताकिद राष्ट्रीय रस्ते प्राधिकरणाने अतिक्रमण धारकांना दिली आहे. अन्यथा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण स्वखर्चाने अतिक्रमणे काढून अतिक्रमच धारकांकडून खर्चाची रक्कम वसूल करणार असल्याची नोटिस प्राधिकरणाने प्रसिद्ध केली आहे.
पुणे -सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील कवडीपाट ते कासुर्डी दरम्यान १५ नोव्हेंबर २०२२ रोजी प्राधिकरणाने अतिक्रमाविरुध्द सुरू केलेली कारवाई अचानक थांबविल्याने या रस्त्यावरील सर्व अतिक्रमणे वर्षानंतर जैसेथे होऊन नवीन अतिक्रमणांत भर पडली आहे. उरुळीकांचन (ता. हवेली ) ग्रामपंचायत हद्दीतील वाहतुक कोंडींचा मोठा प्रश्न या ठिकाणी निर्माण झाला आहे. Uruli Kanchan
या वाहतुक कोंडीला अतिक्रमणे ही तितकेच जबाबदार असल्याने या रस्त्यांना मोकळा श्वास कधी मिळणार अशी मागणी तीव्र स्वरूपात होत होती. या संदर्भात अतिक्रमणांवरील कारवाई कधी होणार म्हणून वृत्त प्रसिद्ध करण्यात आले होते. त्यानंतर २८ नोव्हेंबर रोजी वृत्तपत्रात जाहीर नोटीस प्रसिद्ध करून ५ डिसेंबर पर्यंत अतिक्रमणे काढून टाकण्याची ताकीद अतिक्रमण धारकांना दिली आहे.
राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण पुणे यांच्या अधिकार क्षेत्रामधील पुणे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गाच्या हद्दीमध्ये कासुर्डी ते कवडीपाट राष्ट्रीय महामार्ग क्र. ६५ च्या विस्तारीकरणास अतिक्रमणांनी अडथळा निर्माण केला आहे. या सद्दस्थितील कारवाई प्राधिकरणाने गत वर्षी म्हणजे वर्ष २०२२ मध्येच पूर्ण करणे आवश्यक असताना, प्राधिकरणाने वेळकाढूपणा करुन या गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष केले होते.
अखेर २८ नोंव्हेबर रोजी प्राधिकरणाने या संदर्भात नोटीस प्रसिद्ध करीत महामार्गावरील लांबीदरम्यान रस्त्याच्या मध्यापासून दोन्ही बाजूस १५ मीटरमधील अतिक्रमणे स्वखर्चाने काढून घ्यावीत. अन्यथा ही अतिक्रमणे भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण पुणे यांच्यावतीने राष्ट्रीय राजमार्ग नियंत्रण (जमीन आणि वाहतूक) अधिनियम २००२ अन्वये निष्कासीत करण्यात येतील अशी ताकिद दिली आहे. त्याचा खर्च व दंड संबंधित धारकाकडून वसूल करण्यात येईल अशी माहिती प्रकल्प संचालक संजय कदम यांनी दिली आहे.