Pune News : धक्कादायक! पत्नीचा राग लहान मुलीवर, जेवणात चिकन दिले नाही म्हणून केले ‘हे’ कृत्य; पाषाण परिसरातील घटनेने खळबळ…

Pune News : पुण्यातील पाषाण परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पत्नीने जेवणात चिकन दिले नाही याचा राग आल्याने पतीने पत्नीचा राग लहान मुलीवर काढला. पतीने जेवणात चिकन दिले नाही म्हणून लहान मुलीच्या डोक्यात विट मारुन तिला गंभीर जखमी केल्याची घटना उघडकीस आली आहे.
याप्रकरणी आरोपी पतीवर चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना पाषाण येथील वाकेश्वर रोड परिसरात सोमवारी (ता.२७) रात्री साडे अकराच्या सुमारास घडली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. Pune News
विकास नागनाथ राठोड (रा. पुनम बेकरीजवळ, वाकेश्वर रोड, पाषाण) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या पतीचे नावे आहे. याप्रकरणी आरोपीचे सासरे रघुनाथ लालु पवार (रा. वृंदावन सोसायटी, पाषाण) यांनी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात बुधवारी (ता.२९) फिर्याद दिली आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, आरोपी विकास राठोड याने सोमवारी रात्री पत्नीकडे जेवण मागितले. पत्नीने त्याला जेवायला दिले. मात्र, जेवणात चिकन दिले नाही याचा राग आरोपीला आला. याच कारणवरुन चिडून त्याने तिथे पडलेली वीट लहान मुलीच्या डोक्यात मारली.
दरम्यान, यामध्ये लहान मुलगी गंभीर जखमी झाली आहे. हा प्रकार समजल्यानंतर फिर्य़ादी यांनी आरोपी विरुद्ध बुधवारी फिर्याद दिली. या घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार कदम करीत आहेत.