Sharad Pawar : मोठी बातमी! शरद पवार गटातील ८ आमदारांना विधीमंडळाची नोटीस, काय आहे प्रकरण जाणून घ्या

Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटातील एक मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या गटातील ८ आमदारांना विधीमंडळाने नोटीस पाठवली आहे. पक्षविरोधी कृती केल्यामुळे आपल्याला अपात्र का करू नये? अशी याचिका उपमुख्यमंत्री अजित पवार गटाने विधीमंडळात दाखल केली आहे.
तसेच आता याचबाबत म्हणणं मांडण्यासाठी विधीमंडळाने शरद पवार गटातील ८ आमदारांना नोटीस पाठवली आहे. या नोटीसला शरद पवार गटाकडून लवकरच उत्तर दाखल केलं जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यामुळे शरद पवार यांना मोठा धक्का बसणार आहे. Sharad Pawar
विधीमंडळाने आत्तापर्यंत शरद पवार गटातील १० आमदारांना नोटीस बजावली आहे. शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांना यापूर्वीच नोटीस पाठवण्यात आली आहे.
त्यानंतर आता विधीमंडळाकडून अनिल देशमुख, प्राजक्त तनपुरे, रोहित पवार, राजेश टोपे, सुनिल भुसारा, बाळासाहेब पाटील, सुमन पाटील, संदीप क्षिरसागर या आठ आमदारांना नोटीस पाठवण्यात आली आहे. या पाठवण्यात आलेल्या नोटीसला आमदार काय उत्तर देणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.