Pune News : तमाशात गुंतवणूक करा चांगला नफा मिळवून देतो म्हणत दाम्पत्याला लाखोंचा गंडा, कोंढवा येथील घटना..

Pune News पुणे : तमाशा व्यवसायात गुंतवणूक केल्यास चांगला नफा मिळवून देतो, असे आमिष दाखवून एका दाम्पत्याला साडेचार लाख रुपयांचा घडा घालण्यात आला आहे. ही घटना २०१४ ते ऑक्टोबर २०२३ या कालावधीत कोंढवा येथे घडली आहे.
राहील तांबे व आमन तांबे (रा. कुबेरा गार्डन, एन.आय.बी.एम. रोड, कोंढवा) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी सुधीर शाम रावत (वय. ६२ रा. एन.आय.बी.एम. रोड, कोंढवा) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. Pune News
मिळालेल्या माहिती नुसार, आरोपी आणि फिर्य़ादी हे एकाच परिसरात राहतात. आरोपींनी फिर्यादी व त्यांच्या पत्नीसोबत ओळख करुन त्यांचा विश्वास संपादन केला.
आरोपी राहील तांबे आणि आमन तांबे यांनी रावत दाम्पत्याला तमाशा फडाचा व्यवसाय सुरु करुन त्यातून चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवले. त्यांच्यावर विश्वास ठेवून फिर्यादी यांनी ४ लाख ४० रुपये आरोपींना दिले.
आरोपींनी पैसे घेऊन कोणताही परतावा न देता तसेच पैसे परत न करता फिर्यादी व त्यांच्या पत्नीची आर्थिक फसवणूक केली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्य़ादी यांनी कोर्टात धाव घेतली.
दरम्यान, कोर्टाच्या आदेशानुसार सीआरपीसी कलम 156(3) नुसार पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.या घटनेचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक थोरात करीत आहेत.