Pune Crime News : आर्मीमध्ये नोकरी देण्याच्या आमिषाने तरुणांची फसवणूक, बनावट ओळखपत्र दाखवून घातला लाखोंचा गंडा, आरोपीला अटक


Pune Crime News पुणे : नोकरीच्या आमिषाने अनेकांची फसवणूक होत असल्याच्या घटनांमध्ये वाढ असल्याचे चित्र असून नुकतीच अशीच एक घटना समोर आली आहे. आर्मीमध्ये अधिकारी असल्याची बतावणी करुन आर्मीमध्ये नोकरी लावण्याचे आमिष दाखवले. तोतया आर्मी ऑफिसरने १५ जणांची १२ लाख ८० हजार रुपयांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. (Pune Crime News)

आर्मीमध्ये नोकरी देण्याच्या आमिषाने फसवणूक करणाऱ्या एका बनावट आर्मी ऑफिसरला अटक केली आहे. लष्करी गुप्तचर पथक आणि वानवडी पोलिसांनी संयुक्त कारवाई करुन मंगळवारी (ता.२६) मध्यरात्री अटक केली आहे.

याप्रकरणी धोंडीबा राघू मोटे (वय २१ रा. मुपो मोटेवडी ता. जत, जिल्हा सांगली) यांनी वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, पोलिसांनी रणजीत कुमार राजेंद्र सिंग (रा कोईमत्तूर राज्य तामिळनाडू) याच्यावर गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. हा प्रकार फेब्रुवारी २०२३ ते सप्टेंबर २०२३ दरम्यान रेस कोर्स वानवडी येथे घडला आहे.

मिळालेल्या माहिती नुसार, फिर्यादी व त्यांचे मित्र सचिन कोळेकर, माळाप्पा पांढरे, व सागर मोटे (रा कंटी ता.जत जि.सांगली) हे वानवडी येथील रेस कोर्स येथे आर्मी भरतीचा सराव करत होते. त्यावेळी आरोपी रणजीत कुमार सिंग हा त्याठिकाणी आला.

त्याने आर्मी इंटेलिजन्समध्ये रेकॉर्ड ऑफिसमध्ये काम करत असल्याचे फिर्यादी व त्यांच्या मित्रांना सांगून आर्मीचे बनावट ओळखपत्र (आयकार्ड) दाखवले. तसेच त्यांना सिकंदराबाद येथे भरती करतो असे सांगून त्यांचा विश्वास संपादन केला.

आरोपीने फिर्यादी व त्यांच्या मित्रांना आर्मी मध्ये नोकरी लागली असल्याचे सांगून बनावट अपॉईंटमेंट लेटर दिले. त्याने फिर्यादी यांच्यासह इतर तिघांकडून वेळोवेळी १२ लाख ८० हजार रुपये रोख आणि ऑनलाइन स्वरुपात घेतले.

तसेच आरोपीने दिलेले अपॉईंटमेंट लटर बनावट असल्याचे लक्षात आल्यानंतर आपली आर्थिक फसवणूक झाल्याचे फिर्यादी व त्यांच्या मित्रांच्या लक्षात आले. त्यांनी २६ सप्टेंबर रोजी वानवडी पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली. तसेच आरोपीने १५ जणांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

दरम्यान , आरोपी रणजीत कुमार राजेंद्र सिंग याला मंगळवारी मध्यरात्री एकच्या सुमारास अटक केली. ही कारवाई लष्करी गुप्तचर पथक आणि वानवडी पोलिसांनी संयुक्त पणे केली.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!