Pimpri Crime : गणरायाच्या स्वागताला आईचा साडी नेसवण्यास नकार, १३ वर्षीय मुलीने केले धक्कादायक कृत्य..

Pimpri Crime पिंपरी : दररोज अनेक धक्कादायक घटना समोर येत आहे. सध्या अशीच एक घटना समोर आली. साडी नेसवण्यास आईने विरोध केल्याने मुलीने ओढणीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना मंगळवारी( ता.१९) दुपारी किवळ्यातील दत्तनगर येथे आहे. (Pimpri Crime)

मुलगी ही देहूरोड येथील श्री शिवाजी विद्यालयात सातवीच्या वर्गात शिकत होती. ती अतिशय बोलकी आणि चुणचुणीत मुलगी होती. रविवारी रात्री तिने शेजाऱ्यांशी गप्पाही मारल्या होत्या. तिच्या अशा अचानक जाण्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिगंबर सूर्यवंशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी देहूरोड-किवळे परिसरात गणपतीच्या आगमनाची धामधूम सुरू होती. प्रधान कुटुंबीयांकडेही गणरायाच्या प्राणप्रतिष्ठापनेची लगबग होती.

या मुलीसह तिची मोठी बहीण आणि लहान भाऊ असे तिघेजण सकाळपासूनच तयारी करीत होते. बाप्पाच्या आगमनाची तिला मोठी उत्सुकता होती. त्यासाठी तिने सकाळीच आईकडे साडी नेसण्याचा हट्ट धरला होता. साडी नेसून नटूनथटून तिला गणपतीचे स्वागत करायचे होते

मात्र, सकाळी साडी नेसवण्यास आईने विरोध केल्याने ती नाराज झाली होती. दुपारी या मुलीची मावशी आणि काका घरी आले होते. त्या वेळीही तिने पुन्हा आईकडे साडी नेसवण्याच्या आग्रह धरला. विशिष्ट पद्धतीची साडी नेसवण्यासाठी तिचा हट्ट सुरूच होता. त्या वेळी आई-वडिलांनी तिला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला.
त्यामुळे चिडलेली ही मुलगी तडक बाथरूममध्ये गेली. बराच वेळ ती बाहेर न आल्याने तिच्या मोठ्या बहिणीने बाथरूमचे दार ठोठावले. मात्र, आतून प्रतिसाद आला नाही. त्यामुळे तिने बाहेर जाऊन खिडकीतून डोकावून पाहिले असता, ती लटकलेल्या अवस्थेत दिसली.
त्यानंतर कुटुंबीयांनी बाथरूमचा दरवाजा तोडून तिला खाली उतरवले आणि रुग्णालयात दाखल केले. उपचारांपूर्वी तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. या घटनेचा पुढील तपास देहूरोड पोलिस करीत आहेत.