Rajasthan Accident : पुन्हा एकदा भीषण अपघाताने देशात हळहळ! राजस्थानमध्ये बस अपघातात ११ जणांचा मृत्यू..

Rajasthan Accident राजस्थान : राजस्थानमधून भीषण बस अपघाताची घटना समोर आली आहे. या अपघातात ११ जणांचा मृत्यू झाला आहे. तर १२ हून अधिक जण जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आणि बचावकार्य सुरु केले. (Rajasthan Accident)

मृतांमध्ये सहा महिला आणि पाच पुरुषांचा समावेश आहे. सर्व मृत गुजरातच्या भावनगर येथील रहिवासी असल्याची माहिती आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, बसमध्ये एकूण ६० प्रवासी प्रवास करत असल्याची माहिती आहे. बसमधील प्रवासी भावनगरहून मथुरेला दर्शनासाठी जात होते. मात्र भरतपूर-आग्रा महामार्गावर बसमध्ये अचानक तांत्रिक बिघाड झाला.

चालक आणि त्याचा साथीदारासह इतर प्रवासीही बसमधून उतरले. चालक आणि त्याचे साथीदार बस पुन्हा सुरु करण्यासाठी प्रयत्न करत होते. दरम्यान अचानक एका ट्रकने बसला जोरदार धडक दिली आणि बाजूला उभ्या असलेल्या लोकांना चिरडले.
या घटनेनंतर एकच गोंधळ उडाला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत उपस्थितांनी तातडीने मदतीने पोलीस आणि इतर हेल्पलाईन नंबरवर फोन फिरवले. काही वेळातच मदत तिथे पोहोचली. मात्र अपघात इतका भीषण होता की मृतदेह महामार्गावर विखुरले होते.
दरम्यान, अपघातानंतर महामार्गावर मोठा चक्का जाम झाला होता. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनीही या घटनेबद्दल शोक व्यक्त केला.