महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी कोण पाहिजे ठाकरे की फडणवीस.? लोकांच्या मनातला सर्वे आला समोर…

मुंबई : राजकीय घडामोडींमुळे मुख्यमंत्रिपद गमावून उपमुख्यमंत्रिपदावर समाधान मानावे लागलेले देवेंद्र फडणवीस यांनाच महाराष्ट्राची मुख्यमंत्रिपदाची सर्वाधिक पसंती असल्याचे स्पष्ट झाले आहे. ‘महाराष्ट्राचा महापोल’ या दैनिक पुढारी वृत्तपत्राने पुढारी न्यूज या नवीन वृत्तवाहिनीच्या लोकार्पण सोहळ्यानिमित्त केलेल्या सर्व्हेत सर्वात जास्त २५ टक्के जणांनी फडणवीस हे त्यांच्या मनातले मुख्यमंत्री असल्याचे सांगितले आहे.

त्यापाठोपाठ शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना २२ टक्के जणांनी पसंती दर्शवलीय, तर विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे १५ टक्के मिळवून तिसर्या स्थानावर, तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार १० टक्के आणि सुप्रिया सुळे ६ टक्के असा महाराष्ट्राचा पसंतीक्रम आहे.
महाराष्ट्रातील आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या पॉलिटिकल सर्व्हेने महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतले आहे. ६० हजारांहून अधिक सॅम्पल साईजच्या या सर्व्हेचा दुसरा टप्पा बुधवारी रात्री प्रदर्शित झाला. त्यात महाराष्ट्राचा एकूण राजकीय कौल संभ्रमात असल्याचे चित्र दिसून आले.

तसेच आज महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका झाल्या, तर ‘एनडीए’कडे 48 टक्के मतांची बेगमी आहे. त्यात भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून ३३ टक्क्यांवर आहे; तर एकनाथ शिंदे यांची शिवसेना ९ टक्के आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस ६ टक्क्यांवर आहे.
दरम्यान‘एनडीए’ आणि ‘इंडिया’ आघाडीच्या मतांच्या टक्केवारीत फारसा फरक नाही. ‘इंडिया’कडे ४३टक्के कौल आहे. त्यात काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना यांना प्रत्येकी १६ टक्के पसंती आहे; तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला ११ टक्के जणांनी पाठिंबा दिलेला दिसतो. याचा अर्थ कोणत्याही एका पक्षाला किंवा आघाडीलासुद्धा स्वबळावर सत्ता स्थापण्यासाठी बरीच कसरत करावी लागेल.
