खाकी वर्दीला मोठा दणका! कोठडीत संशयिताचा मृत्यू प्रकरणी 9 पोलिसांना जन्मठेप; 15 वर्षांनी लागला ऐतिहासिक निकाल

वाशिम : कोठडीत झालेल्या संशयिताच्या मृत्यू प्रकरणात वाशिम जिल्हा सत्र न्यायालयाने ऐतिहासिक निर्णय देत तत्कालीन ठाणेदारासह नऊ पोलिसांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तब्बल 15 वर्षे 1 महिना 23 दिवस चाललेल्या न्यायालयीन प्रक्रियेनंतर हा निकाल लागला असून, पोलीस दलासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

9 मे 2011 रोजी रिसोड पोलीस ठाण्याच्या पथकाने हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील वाढोणा येथील पारधी वस्तीवर धाड टाकून बेग्या पवार या तरुणाला चोरीच्या संशयावरून ताब्यात घेतले होते. चौकशीदरम्यान गुन्ह्याची कबुली मिळवण्यासाठी त्याला मारहाण करण्यात आल्याचा आरोप आहे. गंभीर मारहाणीमुळे 10 मे रोजी कोठडीतच त्याचा मृत्यू झाला.
घटनेनंतर सीआयडीने 34 दिवस तपास करून तत्कालीन ठाणेदार महादेव माणिक धांडे यांच्यासह नऊ पोलिसांविरुद्ध खुनासह अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला होता. दीर्घ सुनावणीनंतर जिल्हा सत्र न्यायाधीश जयसिंग झपाटे यांनी सर्व आरोपींना दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

बेग्या पवार यांच्या कुटुंबीयांनी सांगितले की, त्यांच्यावर यापूर्वी कोणताही गुन्हा नव्हता. केवळ पारधी समाजातील असल्यामुळे त्यांना खोट्या प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न झाला. निकालानंतर कुटुंबीयांनी न्यायालय, सीआयडी आणि सरकारी वकिलांचे आभार मानत अखेर न्याय मिळाल्याची भावना व्यक्त केली.

या निर्णयामुळे कोठडीतील अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये कायद्यापुढे कुणालाही सूट नसल्याचा स्पष्ट संदेश गेला असून, अशा घटनांवर कठोर कारवाई होऊ शकते, हेही अधोरेखित झाले आहे.