पुणे जिल्ह्यातील 68 हजार शेतकऱ्यांना मिळाला रब्बी हंगामातील पिकांसाठी कर्जाचा लाभ, पीडिसीसी बॅंकेकडून ५५१ कोटींचे पीककर्ज वाटप…

पुणे : चालू वर्षीच्या रब्बी हंगामातील पिकांसाठी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या वतीने पीडीसीसी बँकेने मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांना पीककर्ज दिले आहे. अखेरपर्यंत एकूण ५५१ कोटी ५९ लाख ९२ हजार रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे. याबाबत जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे यांनी माहिती दिली आहे.
या कर्ज वाटपाचा जिल्ह्यातील ६८ हजार १० शेतकऱ्यांना फायदा झाला आहे. शेतकऱ्यांना आणखी येत्या ३१ मार्चपर्यंत रब्बी पिकांसाठी कर्ज वाटप केले जाणार आहे. रब्बी हंगामातील पिकांसाठी शेतकऱ्यांना कर्ज वाटपाचे हे प्रमाण एकूण उद्दिष्टाच्या ८०.४४ टक्के इतके पूर्ण झाले आहे, असेही त्यांनी सांगितले आहे.
याबाबत माहिती अशी की, रब्बी हंगामातील पिकांसाठी जिल्हा बँकेच्या वतीने प्रत्येकी कमाल ३ लाख रुपयांपर्यंतचे पीक कर्ज हे शून्य टक्के व्याजाने देण्यात येते. जिल्हा बॅंकेच्या वतीने मागील १५ वर्षांपासून शेतकऱ्यांना तीन लाख रुपयांपर्यंतचे पीक कर्ज शून्य टक्के व्याजाने वितरित करण्यात येत होते. मात्र मागील तीन वर्षापुर्वी केंद्र सरकारने व्याज परताव्यावरील सवलतीत अर्ध्या टक्क्याने कपात केलेली आहे.
परंतु राज्य सरकारच्या सुचनेनुसार या अर्धा टक्क्याचा फरकाचा भार उचलण्याची तयारी राज्य सहकारी बँकेने दर्शविली आहे. पुणे जिल्ह्यातील रब्बी हंगामातील पिकांसाठी जिल्हा बॅंकेने ६८५ कोटी ७३ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. यामुळे शेतकऱ्यांना याचा चांगला फायदा होत आहे.
सुलभ कर्जवाटप हे उद्दिष्ट यंदाचा रब्बी हंगाम संपेपर्यंतचे आहे. एकूण उद्दिष्टांपैकी आतापर्यंत यापैकी ८०.४४ टक्के उद्दिष्ट पूर्ण झाले आहे. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही राज्यात नावलौकिक मिळवलेली बँक असून याबाबत शेतकऱ्यांना विविध प्रकारच्या योजनेचा लाभ या बँकेतुन दिला जातो.