संतापजनक! बीडमध्ये ५ वर्षीय चिमुकलीवर नात्यातीलच नराधमाकडून अत्याचार, पीडितेच्या आईवर ग्रामस्थांचा दबाव; महाराष्ट्र हादरला…

बीड : राज्यात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये अलीकडे वाढ होताना दिसत आहेत. बलात्कार, विनयभंग, छेडछाड अशा दिवसाला एक ते दोन घटना दररोज घडत आहेत. : मालेगावच्या डोंगराळे येथील घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला असून सर्वत्र संतापाची भावना आहे.

३ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करून तिची निर्दयीपणे हत्या केल्याची घटना ताजी असतानाच आता बीडमध्ये एका साडेपाच वर्षीय चिमुरडीवर लैंगिक अत्याचार झाला आहे. विशेष म्हणजे नात्यातीलच मुलाने अत्याचार केल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
तर, धक्कादायक बाब म्हणजे गावातील लोकांनी गुन्हा दाखल न होण्यासाठी मुलीच्या आईवर दबाव आणल्याचे देखील प्राथमिक तपासात समोर आलं आहे. ही घटना ११ नोव्हेंबर रोजी घडली. परंतु तब्बल चार दिवस मुलीला उपचारासाठी जाण्याची परवानगी गावकऱ्यांनी दिली नाही.

बदनामी होईल या भीतीने गावात बैठका घेऊन प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची माहिती तपासात समोर आली आहे. मुलीच्या आईवर धमक्या देत तक्रार करू नये असा दबाव आणला गेला.
मात्र मुलीची यातना दिवसेंदिवस वाढत गेल्यावर तिच्या आईने अखेर गावातील दबाव झुगारून पोलिसांशी संपर्क साधला. नातेवाईकांनीही जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांना कळवल्यानंतर शिरूर कासार पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला.
सध्या पीडित चिमुरडीवर बीडच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असून तिची प्रकृती चिंताजनक असल्याचे समोर आले आहे. तसेच आरोपी अल्पवयीन असला तरी त्याच्यावर पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.