हवेली बाजार समितीत ३०१ उमेदवारी अर्ज दाखल ! राष्ट्रवादी व भाजप पुरस्कृत पॅनेल मध्ये मुख्य लढत रंगण्याची शक्यता…!


उरुळी कांचन : आर्थिक उलाढालीच्या बाबतीत आशिया खंडात आघाडीवर असलेल्या हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूकीची रणधुमाळीत  उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या ( ता.३) शेवटच्या दिवसापर्यंत एकुण ३०१ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. आडते मतदारसंघात ४०, विकास सोसायटी मतदारसंघात १६५ व हमाल मतदारसंघात २६ तर ग्रामपंचायत मतदारसंघात ७० उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.

हवेली बाजार समितीत गेली १९ वर्षे प्रशासकराज सुरू होते. बाजार समितीच्या निवडणुका घेण्यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने आदेश दिले होते. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारच्या वतीने हवेली तालुका बाजार समितीची रचना असलेल्या बाजार समितीला अंतिम मंजूरी दिली होती. त्यानुसार कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकांची प्रक्रिया ३० एप्रिल २०२३ पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे.

 

 

 

 

हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक चुरशीची होणार असून अनेक रथी महारथींची प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागणार आहे. तब्बल दोन दशकांनंतर हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक होणार आहे. राज्य सहकार निवडणूक प्राधिकरणाने बाजार समितीची निवडणूक घेण्याचा आदेश दिला आहे. अनेक वर्षांनी होणाऱ्या सहकारातील प्रतिष्ठित असणारी ही निवडणूक तालुक्यातील दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लावणारी असून ही निवडणूक अतिशय चुरशीची होणार आहे. १८ जागांसाठी १७ हजार ४१९ जण मतदानाचा हक्क बजावणार आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडल्याने या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. सर्व राजकीय पक्षांच्या नेतेमंडळींच्या बैठका सुरू असून यामधून पक्षीय दबाव गट निर्माण करण्यासाठी प्रयत्न होताना दिसत आहे. मध्यंतरी महाविकास आघाडी विरुद्ध भाजप अशी लढत करण्याचे प्रयत्न सुरू होते.

हवेली बाजार समितीच्या १८ जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत १८ पैकी ११ संचालक हवेली तालुक्यातील विविध कार्यकारी सोसायटी मधून निवडले जाणार आहेत. यासाठी १३४ सोसायटींचे १ हजार ६५५ सदस्य आहेत. चार संचालक हे ग्रामपंचायत सदस्यांमधून निवडले जाणार आहेत. यासाठी हवेली तालुक्यातील ७१ ग्रामपंचायतीचे ७१३ सदस्य आहेत. दोन व्यापारी प्रतिनिधी निवडण्यासाठी १३ हजार १७३ मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावतील.

बाजार समितीचे कार्यक्षेत्र हे हवेली तालुका आहे. बाजार समितीवर मतदारसंघनिहाय १८ सदस्यीय संचालक मंडळ कार्यरत राहील. त्यातील मतदारसंघनिहाय संचालकांची संख्या अशी-

(१) विकास सोसायटी मतदारसंघ – ११ संचालक. त्यामध्ये ४ राखीव जागा आहेत. महिला संचालकांसाठी २, इतर मागास प्रवर्ग १ आणि १ जागा विमुक्त जाती किंवा भटक्या जमातींसाठी राखीव आहे. 

(२) ग्रामपंचायत मतदारसंघ – ४ संचालक. त्यामध्ये २ जागा राखीव आहेत. अनुसूचित जाती, जमातीमधून १ संचालक आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक १ जागा राखीव आहे. 

(३) व्यापारी – आडते मतदारसंघ – २ संचालक.

(४) हमाल-तोलणार मतदार संघ – १ संचालक. 

 

 

निवडणुकीचा सर्वसाधारण कार्यक्रम पुढीलप्रमाणे –

अर्ज छाननी ५ एप्रिल, वैध अर्ज प्रसिद्धी ६ एप्रिल, अर्ज माघारी ६ एप्रिल ते २० एप्रिल,  अंतीम यादी व चिन्हवाटप २१ एप्रिल, मतदान – २८ एप्रिल, मतमोजणी व निकाल २९ एप्रिल. गुरुवारी राष्ट्रवादी चा पॅनेल होणार जाहीर

हवेली बाजार समितीत राष्ट्रवादी च्या बंडखोर गटाने बाजार समितीत भाजपचा आश्रय घेतला आहे. त्यामुळे अजित पवार हे काय भूमिका घेणार म्हणून तालुक्याचे लक्ष या निर्णायाकडे लागले होते. अखेर त्यांच्या सूचनेप्रमाणे पक्षाचा पॅनेल गुरुवार (ता. ६) रोजी जाहीर होणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!