रेल्वे प्रवाशांनो सावधान! पुणे-मिरज मार्गावर २१ दिवसांचा मेगा ब्लॉक; वंदे भारतसह अनेक गाड्यांचे वेळापत्रक बदलले


पुणे : पुणे-मिरज रेल्वे मार्गावर प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. पुणे-मिरज दुहेरीकरण प्रकल्पांतर्गत नीरा यार्ड येथे सुरू असलेल्या महत्त्वाच्या तांत्रिक कामांमुळे मध्य रेल्वेने ५ ते २५ जूनदरम्यान २१ दिवसांचा मेगा ब्लॉक जाहीर केला आहे. या ब्लॉकचा फटका डीएमयू, वंदे भारत आणि एक्स्प्रेस गाड्यांसह अनेक रेल्वे सेवांना बसणार असून काही गाड्या अंशतः रद्द, काहींचे मार्ग बदलले तर अनेक गाड्या विलंबाने धावणार आहेत.

ब्लॉकमुळे कोल्हापूर-पुणे डीएमयू सेवेत मोठे बदल करण्यात आले आहेत. गाडी क्रमांक ११४२६ कोल्हापूर-पुणे डीएमयू ९, १६, २२ आणि २३ जून रोजी सातारा स्थानकापर्यंतच धावणार आहे. तर १९ आणि २५ जून रोजी ही गाडी लोणंद येथेच थांबवण्यात येणार आहे. तसेच १५ जून रोजी २०४७५ बिकानेर-मिरज एक्स्प्रेस खडकी येथेच प्रवास समाप्त करेल. १९ जून रोजी २०६६९ हुबळी-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसही साताऱ्यापर्यंतच धावणार आहे.

याचबरोबर पुण्याहून सुटणाऱ्या काही गाड्यांचे प्रारंभिक स्थानकही बदलण्यात आले आहे. गाडी क्रमांक ११४२५ पुणे-कोल्हापूर डीएमयू विविध दिवशी सातारा स्थानकावरून सुटेल, तर १९ आणि २५ जून रोजी ही गाडी लोणंदहून रवाना होईल. १६ जून रोजी मिरज-बिकानेर एक्स्प्रेस खडकी स्थानकावरून सुटणार असून १९ जून रोजी पुणे-कोल्हापूर वंदे भारत एक्स्प्रेस साताऱ्यावरून धावणार आहे.

दरम्यान, २४ जून रोजी धावणाऱ्या १२७८० निजामुद्दीन-वास्को एक्स्प्रेसचा मार्गही बदलण्यात आला असून ही गाडी मनमाड-दौंड-कुर्दुवाडी-मिरज मार्गे चालवण्यात येणार आहे.

ब्लॉकच्या कामांमुळे अनेक गाड्या उशिराने धावणार आहेत. कोल्हापूर-पुणे डीएमयू, मिरज-निजामुद्दीन एक्स्प्रेस आणि कोल्हापूर-गोंदिया एक्स्प्रेसच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. याशिवाय कोल्हापूर-पुणे डीएमयू, बंगळूर-गांधीधाम, बंगळूर-एलटीटी, अहमदाबाद-कोल्हापूर, म्हैसूर-अजमेर, बंगळूर-जोधपूर, कोल्हापूर-सीएसएमटी आणि कोल्हापूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेस या गाड्यांना विविध स्थानकांवर १५ मिनिटांपासून अडीच तासांपर्यंत थांबवण्यात येणार आहे.

पुणे-मिरज मार्गावरील दुहेरीकरणाच्या कामाला वेग देण्यासाठी हा ब्लॉक आवश्यक असल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले असून, प्रवाशांनी प्रवासापूर्वी आपल्या गाडीचे अद्ययावत वेळापत्रक तपासूनच नियोजन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. रेल्वेच्या या मेगा ब्लॉकमुळे जून महिन्यातील प्रवासाचे गणित मात्र अनेक प्रवाशांसाठी बदलणार हे निश्चित.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!