आरती करून घरी निघाली, पण वाटेतच दबा धरून बसलेल्या आरोपीचा हल्ला! १६ वर्षीय स्वराच्या हत्येने माणगाव हादरलं; महिलांचा फाशीच्या शिक्षेसाठी एल्गार


माणगाव : नवरात्रोत्सवातील आरती आटोपून घरी परतणाऱ्या १६ वर्षीय मुलीची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना हातकणंगले तालुक्यातील माणगाव येथे शनिवारी (१७ ऑक्टोबर) रात्री घडली. एकतर्फी प्रेमातून हा खून झाल्याचा आरोप असून, स्वरा नितीन उपाध्ये असे मृत मुलीचे नाव आहे. अरुण लगमावर (वय ३७) हा संशयित आरोपी असल्याची माहिती आहे. या घटनेनंतर गावात संतापाची लाट उसळली असून, आरोपीला कठोर शिक्षा देण्याच्या मागणीसाठी महिलांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.

मंदिरातील आरती संपली अन् स्वरावर जीवघेणा हल्ला

स्वरा माणगावातील जैन मंदिर परिसरात राहत होती. संशयित आरोपी तिच्याकडे वारंवार वाईट नजरेने पाहत असल्याचे सांगितले जाते. मात्र, तिने त्याकडे दुर्लक्ष केले होते. शनिवारी रात्री नवरात्रोत्सवानिमित्त वैष्णवी मंदिरात आरतीचा कार्यक्रम सुरू होता. आरती झाल्यानंतर स्वरा घराकडे निघाली. याच वेळी रस्त्यावरील अंधाराचा फायदा घेत दबा धरून बसलेल्या आरोपीने तिच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केल्याचा आरोप आहे.

या हल्ल्यात स्वराच्या गळ्यावर तसेच हातापायांवर वार करण्यात आले. गंभीर जखमांमुळे तिचा जागीच मृत्यू झाला. तिचा मृत्यू झाल्याची खात्री पटल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाल्याची माहिती आहे. या घटनेने परिसरातील नागरिक हादरले असून, एका अल्पवयीन मुलीचा अशा प्रकारे जीव गेल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

‘आरोपीला फाशी द्या’; महिलांचा आक्रमक पवित्रा

घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थ आणि महिलांनी संताप व्यक्त केला. संशयित आरोपीला तातडीने अटक करून खटला जलदगती न्यायालयात चालवावा आणि कठोरात कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी करण्यात आली. आरोपीला गावच्या चौकात फाशी द्यावी, अशी मागणीही संतप्त महिलांनी केली. आरोपीला अटक होईपर्यंत स्वरावर अंत्यसंस्कार करणार नसल्याचा इशारा ग्रामस्थांनी सुरुवातीला दिला होता.

पोलिसांनी आरोपीला पकडण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे आश्वासन दिल्यानंतर दुपारी शोकाकुल वातावरणात स्वरावर अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान, ग्रामस्थांनी संशयित आरोपीच्या घराकडे मोर्चा नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी हस्तक्षेप करून हा प्रयत्न रोखला.

गावात तणाव; जलद कृती दल तैनात

घटनेनंतर माणगावमध्ये तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी जलद कृती दलासह मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. स्वराला न्याय मिळावा, या मागणीसाठी सायंकाळी ग्रामस्थांनी कँडल मार्च काढला. आरोपीवरील पुढील कायदेशीर कारवाई, तपास आणि न्यायालयीन प्रक्रियेकडे आता ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!