महाकुंभ मेळ्यात ११ भाविकांना ह्दयविकाराचा झटका, पहिल्याच दिवशी घडलेल्या घटनेने उडाली खळबळ….

आजपासून सुरू होत असलेल्या प्रयागराजमधील महाकुंभमेळ्यात पवित्र स्नान केल्यानंतर भाविकांना हृदयविकाराचा झटका आल्याच्या घटना समोर आल्या आहेत. २ दिवसांत ११ भाविकांना हृदयविकाराचा झटका आल्याची माहिती आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. प्रयागराज येथे १३ जानेवारी ते २६ फेब्रुवारीदरम्यान महाकुंभ मेळा होणार आहे.
या महाकुंभची तयारी प्रशासनाने पूर्ण केली आहे. महाकुंभला येणाऱ्या भाविकांची कोणतीही गैरसोय होऊ नये म्हणून विशेष उपाययोजना केल्या जात आहेत. यामध्ये आता रुग्णालयात ६ रुग्णांना आणण्यात आले आणि सेक्टर-२० मधील उपकेंद्र रुग्णालयात ५ रुग्णांना आणण्यात आले.
दोन्ही रुग्णालयांमध्ये उपचारानंतर ९ रुग्ण बरे झाले आणि त्यांना घरी पाठवण्यात आले. यामध्ये दोन रुग्णांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना एसआरएन रुग्णालयात रेफर करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. शाही स्नानाआधीच २५ लाख भाविकांनी पवित्र संगमात डुबकी घेतली.
यामध्ये बरोज दोन कोटींहून अधिक भाविक महाकुंभला भेट देण्याची शक्यता आहे. भाविकांना थंडीपासून स्वतःचे रक्षण करण्यास सांगण्यात आले आहे तसेच महाकुंभ मेळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने सर्व तयारी केली आहे. भाविकांची गर्दी वाढत आहे. शाही स्नानाआधीच संगमामध्ये २५ लाखांहून अधिक भाविकांनी स्नान केले आहे.
पहिल्या शाही स्नानासाठी प्रशासनाने १०. ५ कि.मी. लांबीचा घाट तयार केला आहे. अखाड्यातील प्रवेशासाठी दोन विशेष रस्ते तयार करण्यात आले आहेत. नागा साधूंसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. आपत्कालीन स्थितीसाठी विशेष मार्ग तयार करण्यात आला आहे. दरम्यान, साधारण चार हजार हेक्टर क्षेत्रावर महाकुंभसाठी तात्पुरते नगर वसविण्यात आले आहे.