शिवरायांच्या शेजारी मोदींचा फोटो पाहताच अमित ठाकरे संतापले; पुण्यात कॉलेजमध्ये नेमकं काय घडलं?

पुणे : मनसे नेते अमित ठाकरे सध्या पुणे दौऱ्यावर असून महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेत आहेत. याच दौऱ्यात सरकारी तंत्रशिक्षण महाविद्यालयात घडलेल्या एका प्रकारामुळे राजकीय वातावरण तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महाविद्यालयातील वसतिगृह अधीक्षकांच्या कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोंशेजारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो लावण्यात आला होता. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर अमित ठाकरे यांनी मोदींचा फोटो हटवण्यास सांगितल्याची माहिती समोर आली आहे.
अमित ठाकरे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या सुविधांची पाहणी करत असताना विद्यार्थ्यांनी त्यांना या फोटोबाबत सांगितले. त्यानंतर त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांसमोरच मोदींचा फोटो हटवण्यास सांगितले. यानंतर मनसे कार्यकर्त्याने कार्यालयातील पंतप्रधान मोदींचा फोटो खाली उतरवला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून त्यावर विविध राजकीय प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे.

दरम्यान, अमित ठाकरे यांनी केवळ फोटोच्या मुद्द्यावरच लक्ष केंद्रित केले नाही, तर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या मूलभूत सुविधांबाबतही प्रशासनाला जाब विचारला. कँटिनमध्ये विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या जेवणाचा दर्जा आणि खेळाडूंना प्रशिक्षक उपलब्ध नसल्याचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला. यावेळी त्यांनी महाविद्यालयाचे अधीक्षक आणि मुख्याध्यापक यांच्याकडून या समस्यांबाबत माहिती घेतली.


अमित ठाकरे यांच्या पुणे दौऱ्यात शहरातील तब्बल सात महाविद्यालयांना भेट देण्याचे नियोजन आहे. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधून त्यांच्या समस्या समजून घेणे, प्रशासनापर्यंत त्या पोहोचवणे आणि शैक्षणिक व्यवस्थेतील त्रुटींवर आवाज उठवणे हा या दौऱ्यामागचा उद्देश असल्याचे सांगण्यात येत आहे.
विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसोबतच महाविद्यालयांच्या परिसरातील सिगारेट आणि गुटख्याच्या विक्रीविरोधातही कारवाईची मागणी करण्याची भूमिका अमित ठाकरे यांनी घेतली आहे. तसेच शैक्षणिक क्षेत्रातील भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरही ते आक्रमक होणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यांच्या दौऱ्यात रक्षाबंधन कार्यक्रम, वाडिया कॉलेज परिसरातील विद्यार्थ्यांशी संवाद आणि माता रमाई आंबेडकर स्मारकाला अभिवादन अशा कार्यक्रमांचाही समावेश आहे.
मात्र, शिवराय आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोंच्या शेजारी असलेला मोदींचा फोटो हटवल्याचा प्रकार सध्या सर्वाधिक चर्चेत आला आहे. अमित ठाकरे यांच्या या भूमिकेवर भाजपकडून कोणती प्रतिक्रिया येते, तसेच या मुद्द्यावरून मनसे आणि भाजपमध्ये नवा वाद निर्माण होतो का, याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.