पेंच अभयारण्यातील अपघाताचं गूढ वाढलं! परिणय फुकेंचा मुलगा नेमका कोणत्या गाडीत होता? कुटुंबीयांच्या निकटवर्तीयांचा मोठा खुलासा; विरोधकांच्या आरोपांनी राजकारण तापलं

नागपूर : मध्य प्रदेशातील पेंच अभयारण्य परिसरात झालेल्या अपघाताने आता महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडवली आहे. एका तरुणाचा मृत्यू आणि पाच जण जखमी झालेल्या या दुर्घटनेत भाजप आमदार परिणय फुके यांचा मुलगा यथार्थ फुके याच्या भूमिकेवरून वाद निर्माण झाला आहे. विरोधकांनी यथार्थ फुके अपघातग्रस्त गाडी चालवत असल्याचा आरोप केला आहे. मात्र, फुके कुटुंबीयांच्या निकटवर्तीयांनी हा दावा फेटाळत घटनास्थळी दोन गाड्या असल्याची माहिती दिली आहे. त्यामुळे अपघाताच्या रात्री नेमकं काय घडलं, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ४ नोव्हेंबरच्या रात्री मध्य प्रदेशातील सिवनी जिल्ह्यातील कुरई पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेंच अभयारण्याजवळ चारचाकी वाहनाचा भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत नागपूरमधील रेहान अली ऊर्फ झिदान या तरुणाचा मृत्यू झाला, तर पाच जण जखमी झाले. अपघातग्रस्त वाहनाचा क्रमांक एमएच ४० एएच ७२२७ असल्याचे सांगितले जात आहे. हे वाहन आमदार परिणय फुके यांच्या कुटुंबाशी संबंधित असल्याचा आरोप काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्यांनी केला आहे.
या अपघातावेळी यथार्थ फुके घटनास्थळी उपस्थित होते आणि तेच अपघातग्रस्त वाहन चालवत होते, असा दावा विरोधकांकडून करण्यात आला. वाहनातील तरुण-तरुणी मद्यधुंद अवस्थेत असल्याचा आरोपही सोशल मीडियावरील पोस्टमधून करण्यात आला. मात्र, फुके कुटुंबीयांच्या निकटवर्तीयांनी ही माहिती चुकीची असल्याचे सांगितले आहे.

त्यांच्या दाव्यानुसार, त्या रात्री घटनास्थळी दोन चारचाकी वाहने होती. दोन्ही गाड्या व्यावसायिक चालक चालवत होते. यथार्थ फुके पहिल्या गाडीत होते आणि त्या वाहनाचा अपघात झाला नव्हता. त्यांच्या मागून येणारी दुसरी गाडी अनियंत्रित होऊन अपघातग्रस्त झाली. रेहान अली याच गाडीत होता. गंभीर जखमी झाल्यानंतर त्याचा मृत्यू झाला, असे निकटवर्तीयांचे म्हणणे आहे. त्यामुळे यथार्थ फुके कोणत्या वाहनात होते आणि अपघातग्रस्त गाडी कोण चालवत होते, याबाबत संभ्रम कायम आहे.

या प्रकरणावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आक्रमक भूमिका घेतली. अपघातग्रस्त वाहन परिणय फुके यांच्या मालकीचे असल्याचा आणि त्यांचा मुलगा मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवत असल्याचा आरोप त्यांनी केला. एका तरुणाचा जीव गेल्यानंतर राजकीय दबावातून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न होऊ नये, अशी भूमिका मांडत त्यांनी निष्पक्ष चौकशी आणि दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली.
शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनीही सोशल मीडियावर पोस्ट करून सरकारला धारेवर धरले. महाराष्ट्रातील शेतकरी संकटात असताना लोकप्रतिनिधींच्या कुटुंबातील तरुण भरधाव गाड्या चालवत असल्याचा आरोप त्यांनी केला. अपघातातील वाहन परिणय फुके यांच्या नावावर असल्याचे आणि यथार्थ फुकेच ते चालवत असल्याचे त्यांनी म्हटले. अपघातातील तरुण मद्यधुंद असल्याचाही दावा त्यांच्या पोस्टमध्ये करण्यात आला आहे.
दरम्यान, या प्रकरणात आमदार परिणय फुके यांची प्रतिक्रिया मिळवण्यासाठी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला; मात्र त्यांची वैयक्तिक बाजू समोर आलेली नाही. दुसरीकडे, मध्य प्रदेशातील कुरई पोलिसांनी घटनास्थळी दोन वाहने होती की एक, याबाबत अद्याप अधिकृत खुलासा केलेला नाही.
त्यामुळे या प्रकरणातील सर्वात महत्त्वाचे प्रश्न अद्याप अनुत्तरित आहेत. अपघातग्रस्त गाडी कोण चालवत होते? यथार्थ फुके नेमके कोणत्या वाहनात होते? दोन गाड्या असल्याचा निकटवर्तीयांचा दावा तपासात खरा ठरतो का? या प्रश्नांची उत्तरे पोलिस तपासातूनच स्पष्ट होणार आहेत. मृत तरुणाच्या कुटुंबीयांना न्याय मिळण्यासाठी या दुर्घटनेची निष्पक्ष चौकशी होणे महत्त्वाचे ठरणार आहे.
