दादांचा फोटो, सुनेत्रा पवारांचा व्हिडीओ अन् आता कारवाईचा इशारा; जय पवारांनी जगतापांना थेट सुनावलं


बारामती : सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीआधीच अजित पवार गटातील अंतर्गत घडामोडींना वेगळं वळण मिळालं आहे. पुरुषोत्तम जगताप यांच्या भूमिकेवरून जय पवार यांनी आता आक्रमक पवित्रा घेतला असून, पक्षाच्या परवानगीशिवाय अजित पवारांचं नाव-छायाचित्र आणि सुनेत्रा पवारांचा व्हिडीओ प्रचारात वापरल्याचा आरोप करत कारवाईचा इशारा दिला आहे. त्यामुळे कारखाना निवडणुकीच्या प्रचारात हा मुद्दा चांगलाच चर्चेत आला आहे.

बारामतीत श्री सोमेश्वर विकासपुरुष अजितदादा पवार पॅनलच्या जाहीरनाम्याचं प्रकाशन करण्यात आलं. यावेळी बोलताना जय पवार यांनी काही दिवसांपूर्वी जगताप यांच्यावर कारवाईबाबत विचारलेल्या प्रश्नाचा संदर्भ दिला. त्यावेळी कारवाई करणार नसल्याचं आपण सांगितलं होतं. मात्र, अजितदादांचं नाव आणि फोटो परवानगीशिवाय वापरू नका, असं स्पष्टपणे बजावलं होतं. तरीही जगताप यांनी सुनेत्रा पवारांचा व्हिडीओ आपल्या पॅनलच्या प्रचारासाठी वापरल्याचं जय पवार यांनी सांगितलं.

इतकंच नाही, तर अजित पवारांच्या आवाजाचा व्हिडीओ तयार केल्याचाही आरोप जय पवार यांनी केला. त्यामुळे आता पक्षाच्या वतीने जगताप यांच्यावर कारवाई केली जाणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. ही कारवाई नेमकी काय असेल, याबाबतची माहिती ६ ऑक्टोबरच्या सायंकाळपर्यंत दिली जाईल, असंही त्यांनी सांगितलं. मात्र, जगताप यांच्यासोबत गेलेल्या इतर कार्यकर्त्यांवर कारवाई केली जाणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. ही परिस्थिती एका व्यक्तीमुळे निर्माण झाल्याचं त्यांचं म्हणणं आहे.

जगताप यांच्या पॅनलची सुरुवात कशी झाली, याबाबतही जय पवार यांनी महत्त्वाची माहिती दिली. २८ तारखेला पुरुषोत्तम जगताप भेटले होते. त्यांनी १६ नावं दिली होती. त्यानंतर सुनेत्रा पवार यांच्यासोबत चर्चा करण्यात आली. २९ तारखेला पहाटे दोन वाजेपर्यंत बैठक झाली आणि सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत नवीन पॅनल तयार करून अंतिम करण्यात आलं होतं. त्यामुळे सध्याची जगताप यांची भूमिका पाहता त्यांच्या मनात हे आधीपासूनच होतं का, असा प्रश्न उपस्थित होत असल्याचं जय पवार म्हणाले.

हा पॅनल सर्वसमावेशक असल्याचं सांगत त्यांनी उमेश पाटील यांचा या प्रक्रियेत कोणताही सहभाग नसल्याचं स्पष्ट केलं. सुनेत्रा पवार आणि पक्षातील पदाधिकाऱ्यांनी एकत्रितपणे पॅनल तयार केल्याचं त्यांनी सांगितलं. कारखाना व्यवस्थित चालवणं हाच मुख्य उद्देश असून, अनेक वर्षे अजित पवार यांनी ज्या पद्धतीने कारखाना चालवला, त्याच पद्धतीने पुढेही कारभार करण्याचा प्रयत्न केला जाईल, असं जय पवार म्हणाले.

या निवडणुकीत पक्षाचा कोणताही स्वार्थ नसल्याचंही त्यांनी सांगितलं. ही कारखान्याची निवडणूक असून, कोणत्याही पक्षाने शिरकाव केला आहे असं वाटत नसल्याचं त्यांनी नमूद केलं. कारखान्याच्या कामकाजात काही चूक झाल्यास त्याची जबाबदारी आपली असेल, असंही जय पवार यांनी स्पष्ट केलं.

दरम्यान, सध्याच्या प्रचाराला मोठा प्रतिसाद मिळत असल्याचा दावा जय पवार यांनी केला. विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीपेक्षाही अधिक लोक प्रचारात सहभागी होत असल्याचं ते म्हणाले. लोकसभा निवडणुकीत अनेकांनी शरद पवारांना साथ दिली होती, मात्र त्याच लोकांचा सहभाग सध्या आपल्या बाजूनेही दिसत असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यामुळे सोमेश्वर कारखाना निवडणुकीत पॅनलच्या लढतीसोबतच जगताप यांच्यावरील प्रस्तावित कारवाईचा मुद्दा पुढील काही दिवसांत आणखी तापण्याची शक्यता आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!