‘तो मेसेज पाठवला आणि मृत्यूचा सापळा रचला गेला!’ पुण्यातून रहस्यमयरीत्या गायब झालेल्या व्यक्तीचा सांगलीत खून; आरोपींच्या कबुलीने पोलिसही हादरले

पुणे : पुण्यातील वारजे परिसरातून बेपत्ता झालेल्या 59 वर्षीय व्यक्तीच्या प्रकरणाने अखेर थरारक वळण घेतले आहे. सुरुवातीला बेपत्ता असल्याचे वाटणारे हे प्रकरण प्रत्यक्षात अपहरण, मारहाण आणि हत्येचे असल्याचे तपासात उघड झाले आहे. विशेष म्हणजे, नात्यातील एका महिलेला पाठवलेल्या मेसेजमुळे हा संपूर्ण रक्तरंजित कट रचल्याची माहिती समोर आल्याने खळबळ उडाली आहे.
गोकुळनगर परिसरात राहणारे गोविंद उपासे 9 ऑगस्टच्या रात्री मित्रांसोबत जेवण करून घरी परतले होते. सर्व काही सुरळीत असताना मध्यरात्री त्यांच्या मोबाईलवर एक फोन आला. त्यानंतर काही वेळासाठी बाहेर जाऊन येतो असे सांगून ते घराबाहेर पडले. मात्र पहाट झाली, दिवस उजाडला तरी ते परतले नाहीत. कुटुंबीयांनी नातेवाईक, मित्रपरिवार आणि परिचितांकडे शोध घेतला; पण काहीच धागादोरा लागला नाही. अखेर पोलिसांत बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली.

दरम्यान, सांगलीत पोलिसांना एका ठिकाणी संशयास्पद हालचालींची माहिती मिळाली. चौकशीसाठी ताब्यात घेतलेल्या काही तरुणांकडून धक्कादायक माहिती समोर आली. त्यांनी गोविंद उपासे यांना पुण्यातून फूस लावून बोलावले, त्यानंतर त्यांना जबरदस्तीने घेऊन जात मारहाण केल्याची कबुली दिली. मारहाण इतकी अमानुष होती की त्यातच त्यांचा मृत्यू झाला. पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह कालव्यात फेकण्यात आल्याचेही उघड झाले.


तपासादरम्यान पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल कॉल रेकॉर्ड आणि लोकेशन डेटा तपासला. त्यातून आरोपींच्या हालचाली स्पष्ट झाल्या. चौकशीत समोर आलेल्या माहितीनुसार, एका महिलेच्या मोबाईलवर पाठवलेल्या मेसेजमुळे आरोपी संतप्त झाले होते. हा राग इतका वाढला की त्यांनी थेट अपहरण आणि हत्येचा कट रचला.
या प्रकरणात तिघांना अटक करण्यात आली असून त्यांच्यावर अपहरण, खून आणि पुरावे नष्ट करण्याचे गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिस आता या कटामागे आणखी कोणी होते का, तसेच संपूर्ण नियोजन किती दिवसांपासून सुरू होते याचा शोध घेत आहेत.