‘डब्यात कॉकरोच झालेत, मी निघालो!’ उद्धव ठाकरेंच्या राष्ट्रीय प्रवक्त्याचा अचानक राजीनामा; सावरकर, हिंदुत्व अन् पक्षाच्या भूमिकेवर थेट सवाल!


मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील अंतर्गत नाराजी पुन्हा एकदा उघड झाली आहे. पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते आनंद दुबे यांनी आपल्या सर्व पदांसह प्राथमिक सदस्यत्वाचाही राजीनामा दिला. गेल्या काही महिन्यांपासून आपली मुस्कटदाबी होत असल्याचा आरोप करत त्यांनी पक्षाच्या कार्यपद्धतीवर अनेक प्रश्न उपस्थित केले. विशेष म्हणजे, राजीनाम्याची घोषणा करताना त्यांनी केलेल्या ‘प्रवासाच्या डब्यात कॉकरोच झालेत’ या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. मात्र, आपण अद्याप कोणत्याही पक्षात प्रवेश केलेला नसून, चांगली संधी मिळाल्यास पुढील निर्णय घेऊ, असेही त्यांनी स्पष्ट केले.

‘अचानक निर्णय नाही’; काही महिन्यांपासून नाराजी

आनंद दुबे यांनी आपण अचानक राजीनामा देत नसल्याचे सांगितले. गेल्या काही महिन्यांपासून आपली मुस्कटदाबी सुरू असल्याचा त्यांचा आरोप आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना आदर्श मानून आपण काम केले. २०१९ मध्ये काम करण्याची संधी मिळाल्यानंतर प्रामाणिकपणे जबाबदारी पार पाडली; मात्र आता मनातील भूमिका मांडता येत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

हिंदुत्वाची भूमिका मांडता येत नाही? सावरकरांच्या विचारांचा उल्लेख

पक्षात हिंदुत्वाची भूमिका मांडता येत नसल्याचे दुबे म्हणाले. आपण स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारांवर चालणारे असल्याचे सांगत त्यांनी पक्षाच्या सध्याच्या भूमिकेबाबत नाराजी व्यक्त केली. आपल्या प्रवासाच्या डब्यात अनेक ‘कॉकरोच’ झाल्याने तो सोडत असल्याचे विधान त्यांनी केले. ध्रुव राठी आणि शर्जिल हे आपले आदर्श नसल्याचे सांगत स्मित मच्छार यांचा त्यांनी उल्लेख केला. त्यांच्या समर्थनार्थ पक्षाकडून एक पोस्टदेखील केली जात नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

महागाईवर बोला, संपूर्ण यंत्रणेवर प्रश्न नकोत!

राजकीय मतभेद असले तरी व्यक्तिगत हल्ले टाळले पाहिजेत, असे मत दुबे यांनी मांडले. महागाईसारख्या महत्त्वाच्या प्रश्नांवर बोलण्याची गरज असल्याचे सांगत संपूर्ण यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याच्या भूमिकेवर त्यांनी आक्षेप घेतला. विलासराव देशमुख आणि गोपीनाथ मुंडे एकत्र चहा पितानाचे फोटो पाहिल्याची आठवण करून देत त्यांनी राजकारणातील वाढत्या कटुतेवर नाराजी व्यक्त केली.

पक्षातून काढल्याचे पत्र; दुबेंचा गंभीर दावा

आपल्याला पक्षातून काढल्याचे एक बनावट पत्र काही काळापूर्वी समोर आले होते, असा दावा दुबे यांनी केला. पक्षाने या पत्राचे खंडन न केल्याने आपल्यालाच पुढे येऊन स्पष्टीकरण द्यावे लागले, असे ते म्हणाले. या घटनेमुळे मनाला वेदना झाल्याचे सांगत त्यांनी पक्षाची विचारधारा नेमकी कुठे गेली, असा सवाल उपस्थित केला.

पुढे कोणता निर्णय घेणार?

राजीनामा दिल्यानंतर दुबे यांनी आपण अद्याप कोणत्याही पक्षात प्रवेश केलेला नसल्याचे स्पष्ट केले. भविष्यात चांगली संधी मिळाल्यास ती स्वीकारू, असे संकेत त्यांनी दिले. दुसरीकडे, ठाकरे गटातील काही खासदारांनी शिंदे गटात प्रवेश केल्याच्या पार्श्वभूमीवर दुबे यांच्या राजीनाम्याची चर्चा अधिक रंगली आहे. त्यांच्या राजीनाम्यानंतर पक्षाकडून काय प्रतिक्रिया येते आणि दुबे यांचा पुढील राजकीय प्रवास कोणत्या दिशेने जातो, याकडे आता लक्ष लागले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!