खानवडी शाळा उद्घाटनावरून जिल्हा परिषद सदस्य प्रचंड संतप्त; पोलीस-प्रशासनावर ‘हायजॅक’चा आरोप; कार्यक्रमात नाट्यमय घडामोडी…

पुणे : पुणे जिल्हा परिषदेच्या जोती सावित्री जिल्हा परिषद शाळेच्या उद्घाटन कार्यक्रमात प्रशासन आणि पोलिसांच्या व्यवस्थापनावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. शनिवारी (दि. ११ एप्रिल) झालेल्या या कार्यक्रमात जिल्हा परिषद पदाधिकारी आणि सदस्यांनाच दुय्यम वागणूक मिळाल्याचा आरोप होत असून, संपूर्ण सोहळ्याचे चित्रच गोंधळाचे झाले.

पुरंदर तालुक्यातील खानवडी येथे नवोदय विद्यालयाच्या धर्तीवर उभारण्यात आलेल्या या शाळेचे उद्घाटन महात्मा जोतीराव फुले यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री सुनेत्रा पवार उपस्थित राहणार असल्याने मोठी गर्दी आणि कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
कार्यक्रमासाठी जिल्हा परिषद सदस्यांना निमंत्रण देण्यात आले असले तरी त्यांना प्रवेशासाठी आवश्यक पास उपलब्ध न झाल्याने अनेक सदस्यांना कार्यक्रमस्थळी पोलिसांकडून अडवण्यात आले. परिणामी काही सदस्यांना बाहेरच थांबावे लागले, तर काही पदाधिकाऱ्यांना व्यासपीठाखाली बसण्याची वेळ आली, असा आरोप करण्यात आला आहे.

दुसरीकडे, जिल्ह्यातील शिक्षक, ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका तसेच अधिकारी-कर्मचारी यांना ओळखपत्राच्या आधारे प्रवेश देण्यात आला. त्यामुळे सर्व व्यवस्था सुरळीत असल्याचे प्रशासनाचे म्हणणे असले तरी, जिल्हा परिषद सदस्यांनी मात्र आपल्यालाच डावलण्यात आल्याची तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या घटनेमुळे जिल्हा परिषद वर्तुळात प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, हा वाद आता राजकीय पातळीवरही चर्चेत आला आहे.

पुरंदर तालुक्यातील खानवडी येथील जोती सावित्री जिल्हा परिषद शाळेच्या उभारणीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे महत्त्वपूर्ण योगदान असल्याचे सांगितले जाते. या प्रकल्पासाठी सरकारी जमीन उपलब्ध करून देणे, जिल्हा नियोजन समितीतून मोठ्या प्रमाणात निधी मंजूर करणे तसेच आवश्यक प्रशासकीय परवानग्या मिळवून देण्यात त्यांचा पुढाकार असल्याचे नमूद केले जाते.
मात्र शनिवारी झालेल्या शाळेच्या उद्घाटन सोहळ्यात त्यांच्या छायाचित्राचा समावेश न केल्याने चर्चा निर्माण झाली आहे. कार्यक्रमात अजित पवार यांचा उल्लेख किंवा फोटो नसल्याने जिल्हा परिषदेच्या पहिल्याच मोठ्या कार्यक्रमात त्यांच्या भूमिकेचा विसर पडल्याची टीका काही स्तरांतून होत आहे.
पुणे जिल्हा परिषदेच्या खानवडी येथील जोती सावित्री जिल्हा परिषद शाळेच्या उद्घाटन सोहळ्यात मोठा वाद निर्माण झाला आहे. कार्यक्रमातील नियोजन, प्रोटोकॉल आणि सन्मानाच्या मुद्द्यांवरून जिल्हा परिषद पदाधिकारी आणि प्रशासनात तीव्र नाराजी दिसून आली.
दरम्यान, कडक पोलिस बंदोबस्त आणि पास-अभावी जिल्हा परिषद सदस्यांना कार्यक्रमस्थळी प्रवेश नाकारण्यात आला. एका गटनेत्याने याबाबत जाब विचारण्याचा प्रयत्न केल्यावर पोलिसांकडून धक्काबुक्की झाल्याचा आरोपही करण्यात आला, मात्र नंतर परिस्थिती शांत करण्यात आली.
या कार्यक्रमात जिल्हा परिषद अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांना व्यासपीठावर एका कोपऱ्यात स्थान देण्यात आले, तर उपाध्यक्ष विवेक वळसे-पाटील यांना तिसऱ्या रांगेत बसावे लागल्याचे दिसून आले. दोन सभापतींना सुरुवातीला व्यासपीठाखाली बसवण्यात आले, ज्यामुळे नाराजी वाढली.
शेवटी, उपस्थित पदाधिकाऱ्यांनी आपल्याला मिळालेल्या दुय्यम वागणुकीबाबत तीव्र संताप व्यक्त केला असून, हा संपूर्ण प्रकार जिल्हा परिषदेच्या प्रोटोकॉल व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा ठरला आहे.
समाजकल्याण सभापती जितेंद्र बडेकर यांनी केला निषेध…
जिल्हा परिषदेच्या ‘ज्योती सावित्री’ शाळेच्या प्रस्तावापासून ते उभारणीपर्यंत दिवंगत नेते अजित पवार यांचा मोठा वाटा आहे. जिल्हा परिषदेच्या धर्तीवर ही शाळा उभी रहावी म्हणून अजित पवार यांनी स्वप्न पाहिले होते. त्याच अजित पवार यांचा व्यासपीठावर छायाचित्र नसल्याने जिल्हा सदस्यांनी कार्यक्रमात नाराजी व्यक्त केली. जिल्हा परिषदेच्या सामाजिक न्याय विभागाच्या सभापती जितेंद्र बडेकर यांनी तर थेट जिल्हा प्रशासनाचा धिक्कार करुन व्यासपीठावर न बसण्याचा
निर्णय घेतला.
लोकनियुक्त कारभार नावापुरताच?
जिल्हा परिषदेची चार वर्षानंतर निवडणूक झाल्यावर लोकनियुक्त सदस्य मंडळ आल्यानंतर पुणे जिल्हा परिषदेचा कारभार लोकनियुक्त सदस्यांकडे येणे अपेक्षित असताना प्रशासकीय कारभारावर जिल्हा परिषद चालू आहे का ?असा प्रश्न निर्माण झाला आहे. जिल्हा परिषद सदस्यांची झालेली अवहेलनेचे पडसाद १६ तारखेच्या सर्वसाधारण सभेत उमटणार अशी चिन्हे दिसू लागली आहेत.