Zika Virus : झिका व्हायरसचा कहर! पुण्यात आढळले रुग्ण, डॉक्टर आणि त्यांची मुलगीही पॉझिटिव्ह…

Zika Virus : पुणे शहरात एक डॉक्टर आणि त्यांच्या मुलीला झिका व्हायरसची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे सगळीकडे मोठी खळबळ उडाली आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. मात्र नागरिकांना योग्य ती काळजी घेण्याचे आव्हान देखील करण्यात आले आहे.
पुणे महानगपालिकेच्या अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली आहे. पुणे महानगरपालिकेच्या (पीएमसी) आरोग्य अधिकाऱ्याने सांगितले की, डॉक्टरांना ताप आणि अंगावर पुरळ उठले, त्यानंतर त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
रुग्णालयाने त्यांच्या रक्ताचे नमुने येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी येथे तपासणीसाठी पाठवले होते. त्यांनी सांगितले की २१ जून रोजी अहवाल आला होता, ज्यामध्ये डॉक्टरांना झिका व्हायरसची लागण झाल्याची पुष्टी झाली.
त्यांनी सांगितले की, डॉक्टर पुण्यातील एरंडवणे भागातील रहिवासी आहेत. अधिकाऱ्याने सांगितले की, डॉक्टरला संसर्ग झाल्यानंतर त्याच्या कुटुंबातील पाच सदस्यांचे रक्ताचे नमुनेही तपासणीसाठी पाठवण्यात आले. तपासात त्याच्या १५ वर्षांच्या मुलीला संसर्ग झाल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, वारीच्या तोंडावर तीन रुग्ण आढळल्याने मोठी चिंता व्यक्त करण्यात येत आहे. संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू तुकाराम महाराज यांचे पालखी सोहळे रविवारी ३० जूनला शहरात दाखल होणार आहेत.
३० जून आणि १ जुलैला दोन्ही पालख्या मुक्कामी राहणार आहेत. या पालखी सोहळ्यासाठी वारकरी तसेच भाविकांची मोठी गर्दी होणार आहे. त्यात झिकाच्या वाढत्या प्रादुर्भावाने चिंता वाढवली आहे.