तरुणांच्या हुल्लडबाजीला चपराक ; पुण्यातील ‘या ‘गड किल्ल्यावर 31 डिसेंबरला बंदी, वनविभागाचा मोठा निर्णय

पुणे :सरत्या वर्षाला निरोप देऊन नवीन वर्षाच्या स्वागतासाठी अख्खा महाराष्ट्र सज्ज झाला आहे. मात्र आज 31 डिसेंबरच्या दिवशी,पुण्यात वनविभागाने मोठे निर्बंध लागू केले आहेत. मध्यरात्री गडकिल्ले आणि टेकड्यांवर तरूण मद्यपान करून धिंगाना घालू नये यासाठी आज रात्री किल्ल्यांवर मुक्काम करण्यास बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे तरुणांच्या हुल्लडबाजीला चपराक बसणार आहे.
पुणे परिसरातील टेकड्या, संरक्षित वनक्षेत्र आणि जिल्ह्यातील किल्ल्यांच्या परिसरात वन विभागातर्फे सकाळपासूनच गस्त वाढविण्यात येणार आहे यामध्ये सिंहगड, राजगड-तोरणा, लोहगड, विसापूर, राजमाची अशा विविध किल्ल्यांवर ३१ डिसेंबरला मुक्काम करण्यास बंदी घालण्यात आली आहे.तसेच याठिकाणी सहानंतर गड पर्यटकांसाठी बंद राहणार असल्याचे वन विभागाने जाहीर केले आहे.
नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला अनेक तरुण मंडळी मोठ्या संख्येने सिंहगडावर जातात. वन विभागाच्या नियमानुसार गडावर मांसाहार आणि मद्यपानास बंदी आहे. तरीही पर्यटकांकडून दारूच्या बाटल्या चोरून गडावर नेण्याचा प्रयत्न केला जातो. त्यामुळे वन कर्मचारी आणि सिंहगड घेरा समितीच्या कार्यकर्त्यांकडून गडाच्या पायथ्याला टोलनाक्यावरच प्रत्येक वाहनाची तपासणी करण्यात येणार आहे.

