खिशात केवळ ५० रुपये, पण इच्छाशक्तीच्या जोरावर बारामतीच्या तरुणांनी सायकलवर गाठले केदारनाथ..
बारामती : इच्छाशक्ती असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही, असे आपण अनेकदा म्हणतो. मात्र ही गोष्ट प्रत्यक्षात उतरून दाखवली आहे ती बारामती तालुक्यातील दोन तरुणांनी या उत्साही तरुणांनी दोन हजार किलोमीटरचा प्रवास सायकलवर करत केदारनाथ गाठले आहे.
बारामती तालुक्यातील सुपे गावात राहणारा विलास वाघचौरे आणि देऊळगाव रसाळ येथील रोहित लोंढे या दोन तरुणांनी ही कामगिरी केली आहे.
या पुढचा प्रवास ते नेपाळ येथील पशुपतीनाथ मंदिराचा करणार आहेत. विलास आणि रोहित यांनी २३ जून रोजी बारामती येथील केदारनाथकडे जाण्यासाठी सायकल प्रवासाला सुरुवात केली.
तब्बल २६ ते २७ दिवसात त्यांनी केदारनाथ मंदिर गाठले. यावेळी केदारनाथ मंदिर परिसरात आल्यावर या तरुणांच्या डोळ्यात अक्षरश: पाणी आले होते. काहींना जीवनात एकदा ही केदारनाथ होत नाही. तर यांनी सायकलवर केलेला प्रवास हा थक्क करणारा आहे. या दरम्यान विलासने घरातुन घेतलेले ५० रुपयांची नोट अद्याप तशीच जपुन ठेवली आहे.
या प्रवासादरम्यान सुरुवातीला बारामती सायकल क्लबच्या माध्यमातुन सायकल, टी शर्ट आणि पंक्चर साहित्य देण्यात आले. तसेच प्रवासात माहिती असणाऱ्या व्यक्तींनी गुगल आणि फोन पे यावरुन पाठवलेल्या पैशावरच हा प्रवास खर्च केल्याचे वाघचौरे यांनी सांगितले.
केदारानाथ दरम्यान हरिद्वार, उज्जैन, ऋषिकेश, धारिवाली आणि गुप्तकाशी हा प्रवास २ हजार किलोमीटरचा झाला. तर आता केदारनाथ करुन बद्रिनाथ आणि पुढे नेपाळमधील पशुपतीनाथ मंदिराकडे जाणार आहे.
यापुढील हा प्रवास अकराशे किलोमीटरचा असणार आहे. तर परतीच्या प्रवासात गुजरातमधील सोमनाथ मंदिराचे दर्शन करुन येण्याचा मानस असल्याचे वाघचौरे यांनी सांगितले.
या प्रवासात राहण्याची आणि जेवणाची कुठेच अडचण आली नाही. राहण्यासाठी शक्यतो मंदिर, धर्मशाळा तर जेवणासाठी मंदिरातील तसेच जाताना कोणता कार्यक्रम असेल तर तिथेच जेवणाचा ताव मारायचा असे ठरलेले होते. त्यामुळे अडचण आली नाही.
हरियाणामध्ये मंदिरात जेवण नव्हते तर शेजारी असणाऱ्या नागरिकांनी गरमागरम जेवण तयार करुन दिले. दरम्यान काही दिवसापुर्वी वाघचौरे याने चारधाम यात्रा दुचाकीवरुन पुर्ण केली होती.
तर आता सायकलवरुन सुपे ते केदारनाथ आणि पशुपतीमंदीर हा प्रवास करीत आहे. त्यांच्या या प्रवासाचे नागरिकांनी कौतुक केले असून त्यांना पुढील प्रवासासाठी शुभेच्छा देखील दिल्या आहेत.