Yogesh Kadam : …तर मलाही वेगळी पावलं उचलावी लागतील!! योगेश कदम यांचा भाजपला थेट इशारा

Yogesh Kadam : राज्याच्या राजकारणात सध्या अनेक घडामोडी घडताना दिसत आहे. लोकसभा निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. निवडणुकीच्या तोंडावर सर्व पक्ष तयारीला लागल्याचे दिसत आहेत.
यंदाची निवडणूक काहीशी चुरशीची असणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरच एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी भाजपला खडे बोल सुनावले. त्यातच आता शिंदे गटातील दापोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि रामदास कदमांचे सुपुत्र योगेश कदम यांनीही स्थानिक भाजपच्या भूमिकेबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.
महायुती असतानाही जर का आमचे कार्यकर्ते भाजपच फोडणार असतील, तर मलाही नाइलाजाने वेगळी पावलं उचलावी लागतील, असा थेट इशारा योगेश कदम यांनी दिला आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा दापोली विधानसभा मतदारसंघात शिवसेना-भाजप हा वाद समोर आला आहे.
यावेळी रायगड लोकसभेत अनंत गिते यांनी दापोली मतदारसंघातून लीडची अपेक्षा सोडाच, पण महायुतीच्या उमेदवाराला कमीत कमी ५५ ते ६० हजारांचं मताधिक्य मिळून तो विजयी होईल असाही विश्वास आमदार योगेश कदम यांनी यावेळी व्यक्त केला. प्रत्येकाला आपापला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. त्याबद्दल गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दापोली येथे येऊन सभा घेतली याचे मला वाईट वाटण्याचं काहीच कारण नाही. Yogesh Kadam
पण या कार्यक्रमात शिवसेनेबरोबर काम करणा-या दोन पदाधिका-यांचे प्रवेश घेतले गेले, जे आजपर्यंत माझ्यासोबत काम करत होते. अशा गोष्टी नको व्हायला होत्या, असेही योगेश कदम म्हणाले.
दरम्यान, ज्यावेळी आपण महायुतीमध्ये एकत्र काम करतोय, चांगला समन्वय ठेवून आपण काम करतोय आणि जर का आमचेच कार्यकर्ते फोडायला लागलात, तर मग शेवटी नाइलाजाने मला देखील काही पावलं उचलावी लागतील आणि म्हणूनच भाजपचे काही वरिष्ठ नेते, मंत्री रवींद्र चव्हाण, सन्माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याबरोबर देखील मी या सगळ्या गोष्टीवर सविस्तर चर्चा करणार आहे, असे त्यांनी सांगितले आहे.