ब्रिजभूषण सिंह यांच्या विरोधातील पैलवानांचे जंतरमंतरवरील आंदोलन मागे…!
नवी दिल्ली : भारतीय कुस्ती महासंघाचे (WFI) अध्यक्ष व भाजप नेते ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात आंदोलनावर गेलेल्या पैलवानांनी शुक्रवारी उशिरा केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांच्याशी चर्चा केल्यानंतर आंदोलन मागे घेतले.
या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सरकारने एक तपासणी समिती स्थापन करण्याची घोषणा केली आहे. या समितीला चार आठवड्यात तपास पूर्ण करून अहवाल सादर करावा लागणार आहे. या अहवालाच्या आधारे सरकार अंतिम निर्णय घेईल.
केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी आंदोलकांसोबत बैठक घेतली. बैठकीनंतर केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले की, बैठकीत खेळाडूंनी आपल्या मागण्या मांडल्या आणि त्यावर आम्ही चर्चा केली. जेव्हा हे आरोप झाले तेव्हा आम्ही भारतीय कुस्ती महासंघाला (WFI) नोटीस बजावली होती आणि त्यांना 72 तासांच्या आत उत्तर देण्यास सांगितले होते.