जिल्हा परिषदेत काम केले त्याच पध्दतीने भविष्यात संधी मिळाली तर काम करुन दाखवू ! लोणीकाळभोर येथे प्रदिप कंद यांच्या हस्ते विकासाकामांचे भूमिपूजन …..

उरुळीकांचन : पूर्व हवेली तालुक्यात जिल्हा परिषदेच्या मार्फत मोठ्या प्रमाणात विकास निधी देऊन काम करण्याची संधी तालुक्याने मिळवून दिली आहे. पूर्व हवेली तालुक्याचा विस्तार लक्षात घेता तालुक्यात विविध मोठे प्रकल्प पूर्णात्वास नेऊन या ठिकाणी पुढील काळात काम करावे लागणार आहे. त्यासाठी संधी मिळाली तर संधीचे सोने केल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक प्रदिप कंद यांनी व्यक्त केले आहे.
लोणीकाळभोर (ता.हवेली ) येथे सोमवार (दि.१४) रोजी ३ कोटी ३७ लाख रुपये विविध विकासकामांचे भूमिपूजन प्रदिप कंद यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते कार्यक्रमात बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते माधव काळभोर , महाराष्ट्र कूसरी पै.राहुल काळभोर, साधना बँकेचे संचालक सुभाष काळभोर , पुणे बाजार समितीचे सभापती दिलीप , काळभोर, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष दिलीप वाल्हेकर,पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य प्रवीण काळभोर, ‘यशवंत’चे संचालक योगेश काळभोर,सिताराम लांडगे शांताराम कटके, माजी उपसरपंच आण्णासाहेब काळभोर, युवराज काळभोर , सरपंच सविता लांडगे, उपसरपंच रतनताई वाळके, कमलेश काळभोर आदी मान्यवर उपस्थित होते. प्रदिप कंद म्हणाले , पुणे जिल्हा परिषदेचा अध्यक्ष असताना हवेली तालुक्याचा विकासाचा अनुशेष भरुन काढता आला. गावठाण परिसर, स्मशानभूमी प्लिव्हिंग ब्लॉक सारख्या संकल्पना राबवून सुशोभित करण्यात आला.
वाडीवस्त्यांवर रस्ते , पाणीपुरवठा योजना यांसारखी भरीव कामे करता आली. सत्ता व पदे असली तर तालुक्याच्या वाट्याला भरीव मदत करता येते हे मी अनुभवले आहे. त्यामुळे जिल्हा परिषद उपाध्यक्ष व अडीच वर्षानंतर अध्यक्ष हा प्रवास करण्याचा योग जुळून आला आहे.परंतु खऱ्या अर्थाने जबाबदारी वाढली आहे. तालुका विस्तारत असून मोठे विकासाचे प्रकल्प उभे करण्याची आवश्यकता आहे. संधी मिळाली तर ते पूर्ण करू असे ते म्हणाले.
कार्यक्रमात सरपंच सविता लांडगे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार, राहुल काळभोर, प्रविण काळभोर, दिलीप वाल्हेकर आदींनी विकासनिधी मिळविण्यासाठी प्रयत्न केल्याबद्दल आभार मानले.